PSU banks Loan: मागील तीन वर्षांपासून देशात किरकोळ कर्जासह सर्वच प्रकारचे कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वाहन, वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्ज घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. बँकांकडूनही किरकोळ कर्ज देण्यास प्राधान्य दिल्याने ही वाढ झाली. मात्र, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वजनिक बँकांना कर्ज वाटप करताना जोखीम ध्यानात घेण्याचे निर्देश दिले आहे.
कर्जाचे वाटप वाढल्यास कर्ज बुडीत निघण्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळे बँका अडचणीत येण्याची शक्यता असते. आधीच उद्योग व्यवसायांना दिलेले कोट्यवधींचे कर्ज बँकांनी लेखा पुस्तकातून हटवल्याने बँकांना मोठा तोटा झाला. आता सणासुदीच्या काळात कर्ज देण्यासाठी बँकांमध्ये चढाओढ लागली आहे. मात्र, बँकांनी ग्राहकांना कर्ज देण्यापूर्वी जोखीम किती आहे हे पाहूनच कर्ज द्यावे, असे आरबीआयने म्हटले आहे.
किरकोळ कर्जात मोठी वाढ
मार्च 2021 ते मार्च 2023 या काळात किरकोळ कर्ज देण्याचे प्रमाण वार्षिक 24.8 टक्क्यांनी वाढले आहे. तर बँकांनी दिलेल्या एकूण कर्जांपैकी किरकोळ कर्जाचे प्रमाण एक तृतीयांश आहे. तर असुरक्षित कर्जाचे प्रमाण म्हणजेच कर्ज देताना कोणतेही तारण घेतले जात नाही, अशा कर्जाचे प्रमाण 22 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर पोहचले आहे.
वेळोवेळी जोखीम तपासा
सार्वजनिक बँकांनी दिलेल्या कर्जाची वेळोवेळी जोखीम तपासणी करायला हवी. तसेच जर बँकांनी नीट जोखीम तपासली नाही तर बँका अडचणीत येण्याची शक्यता RBI ने वर्तवली आहे. वाहन, गृह, व्यवसाय, वैयक्तिक कोणत्याही प्रकारचे कर्ज देताना बँकांनी नफा किती मिळू शकतो, तसेच कर्जामध्ये जोखीम किती आहे हे पडताळून कर्ज द्यायला हवे, असे आरबीआयने म्हटले आहे.
चालू आणि बचत खाती वाढवावी
स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक यासारख्या सार्वजनिक बँकांच्या संचालक मंडळावर सरकारी प्रतनिधीची नियुक्ती केलेली असते. या प्रतनिधीद्वारे बँकांच्या कर्ज जोखमीचे काटेकोरपणे विश्लेषण केले जावे, असे RBI ने म्हटले आहे. तसेच फक्त कर्ज वाटपावर लक्ष्य केंद्रित करण्यापेक्षा बचत आणि चालू खात्यांची संख्या वाढवण्याकडेही बँकांनी लक्ष द्यावे, असे म्हटले आहे.
2024-25 वर्षात असुरक्षित कर्ज बुडीत निघण्याची प्रमाण आणखी 2 टक्क्यांनी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच क्रेडिट स्कोअर कमी असणाऱ्या ग्राहकांना कर्ज देण्याचे प्रमाण खासगी बँकांपेक्षा सार्वजनिक बँकांचे जास्त आहे. त्यामुळेही ही सार्वजनिक बँकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.