तरुणांना स्वावलंबी (Self reliant) बनवण्यासाठी सरकार स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देत आहे. कारण सरकारी नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत. तर खासगी नोकऱ्या बेभरवसा झाल्या आहेत. अशात तुमच्यासमोर बिझनेस (Business) हाच एक मजबूत पर्याय म्हणून समोर असतो. त्याबाबत विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. ही एक कमालीची बिझनेस आयडिया आहे. हा व्यवसाय सुरू केल्यास तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे. झी बिझनेसनं याचा आढावा घेतला आहे. जाणून घेऊ या व्यवसायाबद्दल सर्व काही...
Table of contents [Show]
बाजारपेठेत घट्ट पकड
आजकाल लोकांची जीवनशैली बदलली आहे. डिस्पोजेबल प्रॉडक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे एअर फ्रेशनर्सची मागणी वाढली आहे. सण, वाढदिवस असो की लग्न, वातावरण ताजं ठेवणं... या सर्वांसाठी एअर फ्रेशनर्सचा वापर प्रचंड प्रमाणात केला जातो. मागणी अधिक असल्यानं बाजारपेठही भरलेली दिसून येते. मागच्या काही वर्षांत 13 टक्के सीएजीआरपेक्षा (Compound Annual Growth Rate) जास्त वाढीसह रूम, एअर फ्रेशनर्सनं बाजारात आपली पकड घट्ट केली आहे. एकूणच अशा परिस्थितीत एअर फ्रेशनर उत्पादनाच्या व्यवसायात कमाईचीदेखील मोठी संधी आहे.
परवानगी आणि नोंदणी
एअर फ्रेशनर मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही सुरू करू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला काही मूलभूत नोंदणीची गरज असेल. भारतीय मानक ब्युरोकडे (BIS) यासंदर्भात तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल. स्थानिक प्राधिकरणाकडून व्यापार परवाना घ्यावा लागणार आहे. एमएसएमई उद्यम ऑनलाइन नोंदणीसह, जीएसटी नोंदणी, प्रदूषण मंडळाकडून एनओसीदेखील घेणं गरजेचं ठरणार आहे.
गुंतवणूक किती?
व्यवसाय करताना आधी त्यात गुंतवणूक किती आणि त्यानंतर नफा कसा मिळणार, या सर्वांचा विचार केला जात असतो. एअर फ्रेशनर्स ज्याची बाजारपेठ वाढत चालली आहे, त्यात नफा नक्कीच मिळणार आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं (Khadi & Village Industries Commission) एअर फ्रेशनर मॅन्युफॅक्चरिंग युनिट प्रकल्पाचा अहवाल तयार केला आहे. आयोगाच्या रिपोर्टनुसार, एअर फ्रेशनर मॅन्युफॅक्चरिंग युनिटची एकूण किंमत 21 लाख 56 हजार रुपये आहे. मात्र, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला केवळ 2 लाख 16 हजार रुपये स्वतःहून गुंतवावे लागणार आहेत. उर्वरित रकमेसाठी तुम्हाला वित्तपुरवठा करावा लागेल.
नफ्याचं गणित
सुरुवातीला तुम्हाला 2 लाख 16 हजार गुंतवावे लागतील. त्यानंतर तुम्ही 14 लाख 40 हजार रुपयांचं मुदत कर्ज आणि 5 लाख रुपयांचं खेळतं भांडवल कर्ज घेऊ शकता. तुम्ही पीएम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गतदेखील कर्जासाठी अर्ज करू शकता. केव्हीआयसीच्या रिपोर्टनुसार, तुम्हाला एअर फ्रेशनर उत्पादनाच्या व्यवसायात पहिल्या वर्षी 3 लाख 18 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळू शकतो. व्यवसाय वाढल्यास तुमचा नफादेखील वाढणार आहे. पाचव्या वर्षी तुम्हाला सुमारे 12 लाख रुपयांचा नफा मिळू शकणार आहे. म्हणजेच व्यवसायातून दरमहा एक लाख रुपयांचं उत्पन्न असणार आहे.