खासगी क्षेत्रातली बँक साउथ इंडियन बँकेनं (South Indian Bank) आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. निधी आधारित कर्ज दर (Marginal Cost of Funds based Lending Rate) 0.5 टक्क्यांनी 0.10 टक्क्यांनी वाढवत असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. बँक 20 जुलै 2023पासून आपले दर वाढवत आहे. केरळस्थित या बँकेनं बीएसई फाइलिंगमध्ये म्हटलं आहे, की 20 जुलै 2023पासून लागू होणारा एमसीएलआर (MCLR) विविध टेन्योरसाठी लागू करण्याचा निर्णय झाला आहे.
एमसीएलआरचा अर्थ काय?
एमसीएलआर म्हणजे किमान दर ज्यावर बँक ग्राहकांना कर्ज देऊ शकते. हा दर निश्चित झाल्यावर कोणतीही बँक यापेक्षा कमी दरानं ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाही. हा दर 2016मध्ये पहिल्यांदा बँकांमध्ये लागू करण्यात आला होता. बँकेनं यासंदर्भात माहिती दिली आहे. ओव्हरनाइट एमसीएलआर दर वाढवून 9.05 टक्के करण्यात आला आहे. तर एक महिना आणि तीन महिन्यांसाठी दर 9.10 टक्के आणि 9.10 टक्के इतका असणार आहे. सहा महिन्यांचा एमसीएलआर 9.25 टक्के आहे तर एक वर्षाचा कर्जाचा दर आता 9.50 टक्के इतका असणार आहे.
रेपो रेट 6.50 टक्के
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) रेपो रेट 6.50 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय नुकताच घेतला. या निर्णयानंतर बँकेनं दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी, आरबीआयनं मे 2022पासून व्याजदरात 225 बेसिस पॉइंट्सनं वाढ केली आहे.
शेअर्स वधारले
मंगळवारच्या व्यवहारात साऊथ इंडियन बँकेचं शेअर्स 2.25 टक्क्यांनी वाढून 22.70 रुपयांवर बंद झाले. मागच्या एका महिन्यात स्टॉक 25.41 टक्क्यांनी वधारल्याचं दिसून आलं आहे. वर्षभराच्या आधारावर साउथ इंडियन बँकेचे शेअर्स 18 टक्क्यांनी वर आहेत. तर मागच्या एका वर्षात ते तब्बल 190 टक्क्यांनी वाढले आहेत.