Kashmiri Saffron GI Tag: देशात काश्मिरी केशरच्या दरात कमालीची वाढ झाल्याने येथील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. आता काश्मिरी केशरची किंमत 1 ते 2 लाख रुपयांपर्यंत गेली नाही, तर 3.25 लाख रुपये प्रति किलो झाली आहे. काश्मिरी केशरच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे. कारण त्यांच्यासाठी हे पीक फायदेशीर ठरले आहे.
इराणच्या केशरला टाकले मागे
काश्मिरी केशरला जीआय (Geographical Indication) टॅग मिळाला आहे, त्यानंतर जागतिक स्तरावर त्याच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. पूर्वी काश्मिरी केशराला किंमतीच्या बाबतीत मागे टाकणाऱ्या इराणी केशरला सुध्दा आता काश्मिरी केशरने मागे टाकले आहे. वास्तविक पाहता, इराणचे केशर जागतिक बाजारपेठेत काश्मीरचे केशर म्हणून विकले जात होते, त्यामुळे देशातील केशराला रास्त भाव मिळत नव्हता. मात्र, जीआय टॅग मिळाल्यानंतर ही परिस्थिती बदलली असून काश्मिरी केशराला जागतिक बाजारपेठेत किफायतशीर भाव मिळत आहे.
परदेशात प्रचंड मागणी
GI टॅगमध्ये एखाद्या उत्पादनाचे विशेष भौगोलिक स्थान दिसून येते आणि उत्पादनाची खासियतही समोर दिसते. यामुळे कोणत्याही उत्पादनाला विशेषत: जागतिक बाजारपेठेत विशेष महत्त्व मिळते, जे आता काश्मिरी केशराला मिळत आहे. अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय देशांतून काश्मिरी केशराला मोठी मागणी आहे. काश्मिरी केशर हे जगातील एकमेव GI टॅग केलेले केशर आहे, ज्याच्या आधारे जागतिक खरेदीदारांना त्याच्या सत्यतेवर विश्वास बसत आहे आणि खरेदीदार आता त्याची खरेदी वाढविण्यास प्राधान्य देत आहेत.
जीआयमुळे चांदीपेक्षा महागले केशर
आता काश्मिरी केशरसमोर चमकणारा धातू म्हणजेच चांदीच्या किमतीही कमी वाटत आहेत. कारण 10 ग्रॅम केशरच्या पॅकेटची किंमत 3250 रुपयांवर आली आहे, तर एवढ्या पैश्यांमध्ये सध्याच्या दरानुसार 47 ग्रॅम चांदी येते. या पिकाच्या उत्पादनात वाढ झाल्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत असून, आता पूर्वीपेक्षा अधिक लागवडीसाठी प्रयत्न केले जात आहेत. काश्मीर घाटीत केशरचे वार्षिक 18 लाख टन उत्पादन नोंदवले जात असून त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.