पोहे हा सामान्य नागरिकांसाठी आवडीचा नाश्ता आहे. वर्षाचे 12 महिने पोह्याला देशभरात मागणी असते. परंतु आता पोह्यांचे भाव वाढले असून सामान्य नागरिकांना आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे. भाजके पोहे, दडपी पोहे आणि पातळ पोह्यांच्या दरात किलोमागे तीन ते चार रुपयांची भाववाढ झाली आहे. भारतीय बाजारपेठांमध्ये पोहे बनविण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल उपलब्ध नसल्याकारणाने ही भाववाढ झाली आहे असे उत्पादक कंपन्यांनी म्हटले आहे. पोहे भाववाढीमुळे अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांच्या खिशाला अधिक कात्री लागणार आहे.
भाववाढीचे मुख्य कारण
धान किंवा साळीपासून पोहे बनवले जातात. बाजारात साळीची कमतरता असल्याकारणाने पोह्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशातील छत्तीसगढ, गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांत पोहे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते. परंतु कच्च्या मालाचा तुटवडा असल्याने पोहे प्रक्रिया उद्योजकांनी ही भाववाढ केली आहे.
कच्च्या मालाचा तुटवडा का?
मध्यंतरी सरकारने तांदळाची निर्यात बंद केली होती. परंतु आता केंद्र सरकारने तांदळावरील निर्यात बंदी मागे घेतली आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात होते आहे. यामुळे पोहे मिल उत्पादकांना साळीचा तुटवडा भासतो आहे. साहजिकच तांदूळ निर्यातीचा वेळ वाढल्यामुळे साळीचू उपलब्धता कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या साळीचे भाव वाढल्याने उत्पादकांनी पोह्यांचे भाव वाढवले आहेत. येत्या काळात निर्यात बंद झाली किंवा सरकारने त्यावर नियंत्रण ठेवले तर ही भाववाढ कमी होऊ शकते असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. कच्च्या मालाच्या खरेदीत जास्त पैसे खर्च लागत असल्याने उत्पादन खर्च देखील वाढला आहे. त्यामुळे ही भाववाढ करणे अपरिहार्य असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
महागाईत खिशाला झळ
पोह्यांच्या किमतीत घाऊक बाजारात क्विंटलमागे 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. तर किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात किलोमागे 3 ते 5 रुपये भाववाढ झाली आहे. सामान्य लोकांना परवडणारा नाश्त्याचा प्रकार म्हणून पोहे ओळखले जातात. देशभरात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने पोहे बनवले जातात आणि लोक मोठ्या आवडीने ते खातात. खिशाला परवडणारा खाद्यपदार्थ म्हणून बघितले जाणाऱ्या पोह्यांची भाववाढ झाल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.