रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याने मागील काही महिन्यांपासून बँकांनी कर्जाचे दर वाढवण्याचा सपाटा लावला आहे. दिवाळीचा सणासुदीचा हंगाम संपताच सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांनी कर्जदारांची झोप उडवली . PNB आणि बँक ऑफ इंडिया या दोन बँकांनी कर्जदरात (MCLR Hike) वाढ केली आहे.
दिवाळी सरताच दोन बँकांनी कर्जदारांना जोरदार दणका दिला आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बँक ऑफ इंडिया या दोन बँकांनी कर्जदरात (PNB and BOI Hike MCLR) वाढ केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने एमसीएलआर दर 0.30% वाढवला आहे. बँक ऑफ इंडियाने कर्जदरात 0.15% वाढ केली आहे. ज्यामुळे या दोन्ही बँकांची सर्वच प्रकारातील नवीन कर्जे महागली आहेत. तसेच विद्यमान कर्जदारांना कर्जाचा हप्ता फेडताना (EMI Will Rise) पैशांची जास्त तजवीज करावी लागणार आहे. 'ईएमआय'ची वाढीव रक्कम अॅडजस्ट करताना कर्जदारांना मासिक बजेटमध्ये काटछाट करावी लागण्याची शक्यता आहे.
पीएनबी बँक आणि बँक ऑफ इंडियाचे नवीन कर्जदर 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. पंजाब नॅशनल बँकेचा एक वर्ष मुदतीचा एमसीएलआर दर 8.05% इतका वाढला आहे. यापूर्वी तो 7.75% इतका होता. त्याशिवाय 3 वर्ष मुदतीच्या कर्जाचा दर आता 8.35% इतका वाढला असल्याचे 'पीएनबी'ने शेअर बाजाराला कळवले आहे.
बँक ऑफ इंडियाने देखील कर्जदरात वाढ करत ग्राहकांना झटका दिला आहे. बँक ऑफ इंडियाचा एक वर्ष मुदतीचा एमसीएलआर दर 7.95% इतका वाढला आहे. यापूर्वी तो 7.80% इतका होता. इतर कालावधीत मुदतींच्या कर्जांवर यापुढे 8.10% इतका व्याजदर लागू होणार असल्याचे बँकेने म्हटलं आहे.
एक वर्ष मुदतीच्या एमसीएलआर दराने वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज आणि गृह कर्ज यांचे मूल्यांकन केले जाते. दर महिन्याला बहुतांश बँका MCLR या व्याजदराचा आढावा घेतात. मागील पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवल्यानंतर एसबीआयसह अनेक बँकांनी MCLR चा आढावा घेतला होता.