Matru Vandana Yojana: मुलीच्या जन्माचे गुणोत्तराचे प्रमाण वाढावे यासाठी शासन विविध योजना राबवित असते. मुलांच्या जन्माच्या गुणोत्तरा मागे मुलीच्या जन्माच्या गुणोत्तराचे प्रमाण अद्यापही कमीच आहे. ही बाब लक्षात घेता शासन अनेक प्रोत्साहनपर योजना राबवित आहे. 'पहिली बेटी धन की पेटी' या म्हणीला सार्थ ठरवत भारत सरकार 1 जानेवारी 2017 पासुन प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) राबवित आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी शासनाकडून मदत दिली जाते. आनंदाची बाब म्हणजे आता या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे आणि त्यानुसार दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या आईला 6 हजार रुपये दिले जाणार आहे. दुसऱ्या अपत्याच्या वेळी दिली जाणारी ही रक्कम एकरकमी आहे.
Table of contents [Show]
2017 पासुन लागू
भारत सरकारने 1 जानेवारी 2017 पासुन प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY)लागू केली. ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) 2013 च्या कलम 4 अंतर्गत केल्या जाणाऱ्या तरतुदींनुसार राबविण्यात येते. यामध्ये मातेसह बाळाचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी मातांना निधी दिला जातो.
सुधारीत योजना काय आहे?
गर्भवती महिलांना मातृवंदन योजनेच्या माध्यमातून अतिरिक्त आर्थिक मदत केली जाते. मार्च 2023 पर्यंत ही मदत 5 हजार रुपयांपर्यंत केली जात होती. तसेच ती 3 टप्प्यांमध्ये मिळत होती. मात्र, आता केंद्राच्या वतीने या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या योजनेत काही सुधारणा करण्यात आल्या असुन पुढील काळात ही रक्कम 2 टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे.
काय आहेत अटी?
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) अंतर्गत एप्रिल 2023 पासुन पहिले अपत्य मुलगा असो अथवा मुलगी त्या मातेला 5000 रुपयांची रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाते. तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यावरच 6 हजार रुपये थेट लाभार्थी महिलेच्या खात्यात एकरकमी जमा होत असते.
या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी महिलेने गर्भधारणेदरम्यान नोंदणी करणे अनिवार्य असेल. जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे आणि स्त्री भृण हत्येला आळा घालणे, हा यामागील उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेणारा रहिवासी देशातील कुठल्याही भागात वास्तव्य करणारा असु शकतो. तो केवळ महाराष्ट्रातीलच असावा अशी कुठलीही अट नाही. या योजनेचा लाभ गरोदर मातेची प्रस्तुती झाल्यानंतर आणि बाळाचे लसीकरण झाल्यानंतरच दिला जातो.
किती महिलांनी घेतला लाभ?
मार्च 2023 पर्यंत या योजनेचा लाभ तीन टप्प्यांमध्ये दिला जात होता. याअंतर्गत 1 जानेवारी 2017 ते मार्च 2023 पर्यंत पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातील 1 लाख 37 हजार 851 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. दुसऱ्या टप्प्यात 1 लाख 37 हजार 727 महिलांनी लाभ घेतला. तर तिसऱ्या टप्प्यात 1 लाख 14 हजार 290 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 2017 रोजी ही योजना सुरु झाली तेव्हापासुन नागपूर जिल्ह्याकरीता 64 कोटी 18 लाख 85 हजार रुपये निधी देण्यात आला.
थकीत रक्कम कधी मिळणार?
संगणक प्रणाली मध्ये अडथळा आल्याने 17 मार्चपासून मातृवंदन योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्कम मिळालेली नाही. परंतु, आता सप्टेंबर महिन्यात ही प्रणाली सुरु झाल्याने सर्व लाभारर्थ्यांना मदत मिळणार आहे. तेव्हा लाभार्थी महिलांनी कागदपत्रांसह स्थानिक अंगणवाडीत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.