कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात तेजीत आलेल्या फार्मा कंपन्यांना आज सोमवारी 26 डिसेंबर रोजी फटका बसला. आज शेअर मार्केटमध्ये प्रमुख फार्मा कंपन्यांचे शेअर 1 ते 3% नी कोसळले. तेजीमधील शेअर्सची विक्री करुन गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्याचे शेअर बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.
आजच्या सत्रात अजंता फार्माचा शेअर 3.17% नी घसरला. तो 1201 रुपयांपर्यंत खाली आला होता. लुपिनचा शेअर 736.65 रुपयांवर असून त्यात 2.66% घसरण झाली आहे. ग्लेनमार्क फार्माच्या शेअरमध्ये 1.90% घसरण झाली असून तो 421.00 रुपयांवर ट्रेड करत आहे.
आयसीपीए लॅबच्या शेअरमध्ये 1.49% घसरण झाली आहे. आयसीपीएचा शेअर सध्या 851.45 रुपयांवर आहे. डॉ. रेड्डी लॅबचा शेअर 1.47% घसरला आहे. डॉ. रेड्डी लॅबचा शेअर 4246.90 रुपयांपर्यंत खाली आला आहे. ग्रॅन्युएल्स इंडिया 1.36%, लॉरल लॅब 1.25%, बायोकॉन 1.10% आणि सन फार्माचा शेअर 0.86% ने घसरला आहे. मोरपन लॅबचा शेअर 6.92% ने घसरला. सुवेन फार्माच्या शेअरमध्ये 5.03% घसरण झाली.
गेल्या आठवड्यात चीनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आल्याने चीनमध्ये दररोज काही कोटी पॉझिटीव्ह आढळत आहे. या वृत्तानंतर भारतात आरोग्य यंत्रणेला अॅलर्ट देण्यात आला आहे. केंद्र सरकारने नुकताच याबाबत बैठक घेऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला होता. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने तिथं धुमाकूळ घातला असून याचा प्रसार जगभरात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे गेल्या आठवड्यात फार्मा कंपन्यांच्या शेअर्सनी तेजी अनुभवली होती.