चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने तिथं धुमाकूळ घातला असून याचा प्रसार जगभरात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेअर बाजारांत प्रचंड घसरण झाली आहे. मात्र फार्मा कंपन्यांच्या शेअर्सनी आज प्रतिकुल बाजारात तेजी अनुभवली. ग्लेनमार्क फार्मा, सन फार्मा, मोरपेन लॅब्स, सुवेन फार्मा, आरती ड्रग्ज, डीव्हीज लॅब यासारखे प्रमुख फार्मा शेअर वधारले.
आजच्या सत्रात मोरपेन लॅब्सचा शेअर 12.5% ने वधारला. त्याखालोखाल शिल्पा मेडिकेअरच्या शेअरमध्ये 10% वाढ झाली. आयओएल केमिकल्स अॅंड फार्माचा शेअर 6% ने वधारला. सुवेन फार्माच्या शेअरमध्ये 3% वाढ झाली. आरती ड्रग्ज, कॅपलिन पॉइंट लॅब, ग्रॅन्युएल्स इंडिया, डिव्हीज लॅब या शेअरमध्ये 1% वाढ झाली. त्याच प्रमाणे अजंता फार्मा, बायोकॉन, सिंजेन या शेअरमध्ये 1% वाढ झाली.
आजच्या सत्रात शिल्पा मेडिकेअर या कंपनीच्या शेअरमध्ये 10% वाढ झाली. शिल्पा मेडिकेअरचा शेअर आज 298 रुपयांपर्यंत वाढला होता. आज तो 267.95 रुपयांवर खुला झाला होता. कंपनी बाजार भांडवल 2499.89 कोटी इतके आहे. गेल्या आठवड्यात त्याने 299 रुपयांचा स्तर गाठला होता.
जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा अचानक वाढला आहे. चीनमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेत लाखो रुग्ण बाधित झाले आहेत. यामुळे आज फार्मा कंपन्यांसाठी पुन्हा एकदा व्यावसायिक संधी निर्माण झाली असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितले. येत्या काळात कोरोना बाधितांची संख्या वाढत राहीली तर फार्मा शेअरमध्ये तेजी कायम राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
फार्मा स्टॉकमधील तेजीने निफ्टी फार्मा इंडेक्समध्ये प्रचंड वाढ दिसून आली. निफ्टी फार्मा इंडेक्स 2.5% ने वाढला. निफ्टी फार्मा इंडेक्सला 12520 अंकावर सपोर्ट आहे. पुढे तो 13000 अंकापर्यंत वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.