चॅट GPT ने गेल्या काही महिन्यांपासून जगभरात धुमाकूळ घातलाय. अनेक बड्या कंपन्यांनी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरु केला असून त्यांच्या कामाच्या पद्धतीत मोठे बदल देखील केले आहेत. आशय लेखन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत खरे तर चॅट GPT हे मोठे आव्हान ठरले आहे. गुगल सर्चला चॅट GPT पर्याय तर ठरणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका क्लिकवर अख्खाच्या अख्खा प्रबंध लिहिण्याची क्षमता चॅट जीपीटीत असल्याकारणाने अनेकांचे यामुळे रोजगार जातील अशी भीती वर्तवली जात आहे.
चॅट जीपीटी तंत्रज्ञान आणि त्याच्या वापराबाबत उलटसुलट चर्चा सुरु असताना आता याच कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून काही लोक घरबसल्या लाखो रुपये कमवत असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे? लोक कसे यातून पैसे कमवत आहेत हे आपण या लेखात जाणून घेऊयात.
फक्त प्रश्न विचारण्यापुरते मर्यादित नाही
गुगल सर्च इंजिन प्रमाणे तुम्ही जर चॅट जीपीटीचा वापर करत असाल तर तेवढ्यापुरते मर्यादित राहू नका. चॅट जीपीटीचा वेगवेगळा वापर करत लोक आपल्या कामाचा व्याप कमी करत आहे आणि पैसे कमवत आहेत. परीक्षेत प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी काही विद्यार्थी चॅट जीपीटी वापरत असल्याची प्रकरणे भारतासह जगभरात समोर आली होती. अशा प्रकारे चॅट जीपीटीचा वापर करणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. परंतु कामाच्या ठिकाणी जर काही कल्पना जाणून घेण्यासाठी, विषय समजून घेण्यासाठी जर तुम्ही याचा वापर करत असाल तर त्यात चुकीचे असे काही नाही. परंतु चॅट जीपीटीने दिलेली माहिती जशीच्या तशी आपल्या नावावर खपवणे चूक आहे.
व्हिडिओ बनवण्यासाठी वाढतोय वापर
चॅट GPT चा वापर कंटेंट जनरेट करण्यासाठी केला जाऊ शकतो, हे आता आपल्या सगळ्यांनाच माहिती झाले आहे. परंतु त्यातून पैसे कमावण्याचा एक नवीन मार्ग काही लोकांनी शोधलाय. युट्युबवर व्हिडियो बनवण्यासाठी कंटेंट जनरेटरला खूप अभ्यास करावा लागतो. अनेक संकल्पना समजून घ्याव्या लागतात. त्यांनतर ते स्क्रिप्ट लिहितात. ही स्क्रिप्ट खूप वेळ खर्चून लिहिली जाते. मात्र काही युट्युबर चॅट GPT चा वापर करून काही मिनिटातच मोठमोठ्या स्क्रिप्ट बनवू लागले आहेत.
आधी युट्युबची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी भरपूर कालावधी लागायचा, तेच काम आता काही मिनिटात होऊ लागल्यामुळे व्हिडियोची निर्मिती संख्या देखील वाढली आहे. युट्युब व्हिडियो मोनेटाईज (YouTube Monetize) करून काही युट्युबर्स लाखो रुपये कमवत असल्याचे समोर आले आहे.
AI सॉफ्टवेअरवरचा देखील वापर
चॅट GPT चा वापर करून कंटेंट बनवल्यानंतर ते वेगवगेळ्या AI सॉफ्टवेअरवर अपलोड केला जातो. Speechify, Speechly सारखे काही सॉफ्टवेअर सध्या उपलब्ध असून त्याद्वारे हवा तसा कृत्रिम आवाज आणि हवे तसे अँकर देखील उपलब्ध करून दिले जातात. अशा पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून काही युट्युबर आज घरबसल्या, खूप कमी वेळात पैसे कमवत आहेत.