चहाच्या स्टाॅलपासून मोठमोठ्या माॅलपर्यंत सर्व ठिकाणी कॅशलेस व्यवहारांची चलती आहे. यासाठी लोक ऑनलाईन पेमेंट आणि क्रेडिट/डेबिट कार्डचा आधार घेत आहेत. तसेच, ज्यावेळी आपल्याला पैशांची चणचण असते. अशावेळी खासकरुन क्रेडिट कार्डचा वापर होतो. हा पर्याय सोपा असल्याने आणि कॅशची गरज मारुन नेत असल्याने याचा वापर जास्त होत आहे.
त्यामुळे बरेचजण घरभाडे भरायला क्रेडिट कार्ड वापरत आहेत. कारण, एखाद्यावेळी पैसे नसले आणि भाडे द्यायची वेळ झाली. अशावेळी क्रेडिट कार्ड कामी येत आहे. मात्र, क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्याची कल्पना योग्य असू शकत नाही. कारण, या पेमेंटमध्ये बऱ्याच नकारात्मक बाबी आहेत, ज्या कार्ड धारकाच्या आर्थिक बाबींवर परिणाम करु शकतात.
कर्जाचा बोजा वाढू शकतो
क्रेडिट कार्डचे व्याजदर ठरलेले असते, त्यात भाडे भरणे सुरूच असते. त्यामुळे एखाद्या महिन्यात पूर्ण रक्कम भरता आली नाही. तर काही दिवसाने त्यावर मोठ्या प्रमाणात व्याज जमा होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला अधिक व्याज भरावे लागते. तसेच, ते थकित पैसे तुम्ही भरले नाही. तर तुमच्यावर कर्ज वाढण्याची शक्यता निर्माण होते.
भाड्याची मर्यादा ठरलेली असते
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने पेमेंट करता, तेव्हा तुम्हाला काही जास्तीचे शुल्कही द्यावे लागू शकतात. तसेच, बरेच क्रेडिट कार्ड भाडे भरण्यासाठी पैशांची मर्यादा ठरवून देतात. त्यामुळे त्यापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला भाड्यासाठी देता येत नाही.
क्रेडिट स्कोअरवर होतो परिणाम
जर तुम्ही भाड्यासाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि एखादा हप्ता थकला तर त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो. त्यामुळे भविष्यात तुम्हाला कर्ज मिळणे अवघड होऊ शकते. याचबरोबर प्रत्येक खर्चासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, त्याचा ही परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो.
क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्याचा पर्याय तेव्हाच निवडावा. जेव्हा तुमच्याजवळ पैशांची कमी आहे. कारण, क्रेडिट कार्ड तुम्हाला व्याजमुक्त अवधी देत असला तरी एक हप्ता चुकला तर तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकू शकता. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल प्रत्येक महिन्याला वेळेवर देऊ शकता. तेव्हाच हा पर्याय तुम्ही निवडा. नाहीतर तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागू शकते.