नुकताच विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) कार इन्शुरन्सबाबत मोठा निर्णय घेतला. वर्षभरात कारचा किती वापर केला किंवा कार किती किलोमीटर धावली यानुसार कार इन्शुरन्स पॉलिसीला 'आयआरडीए'ने परवानगी दिली आहे. 'पे ॲज यू ड्राईव्ह' (Pay As You Drive Insurance) पॉलिसीअंतर्गत वाहनधारकाला गाडीची नुकसान भरपाई आणि थर्ड पार्टी विमा मिळेल. वाहनधारक किती गाडी ड्राईव्ह करतो त्यानुसार विमा प्रीमियम निश्चित केला जाणार आहे. अर्थात एका निश्चित कालावधीत कारचा वापर कमी झाला तर वाहनधारकाला वाहन विमा पॉलिसीवर 5% ते 25% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.
मागील काही वर्षात वाहन विमा उत्पादनात अनेक बदल झाले आहे. कार किंवा मोटर इन्शुरन्स ग्राहकाभिमुख झाला आहे. त्यात आता विमा नियामकाने सुरक्षित ड्रायव्हिंग करणाऱ्या तसेच गाडीचा कमी वापर करणाऱ्या वाहनधारकांसाठी 'पे ॲज यू ड्राईव्ह' या खास विमा पॉलिसीला परवानगी दिली आहे. 'पे ॲज यू ड्राईव्ह' ही पॉलिसी ओन्ड डॅमेज आणि थर्ड पार्टी विमा भरपाईच्या दृष्टीने तयार करण्यात आलेली इन्शुरन्स पॉलिसी आहे. या पॉलिसीत ओन्ड डॅमेजचा प्रीमियम हा गाडी किती किलोमीटर चालली त्यावरुन ठरवला जातो. यापूर्वी हा पर्याय विमा कंपन्यांकडून मोटार इन्शुरन्सवर ‘ॲड ऑन कव्हर’ म्हणून दिला जात होता.
अनेक वाहनधारक वाहनाचा कमी वापर करतात. वर्षभरात त्यांचा वापर इतर वाहनधारकांच्या तुलनेत खूपच कमी असतो. यात प्रोफेशनल व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण आणि निमशहरी भागातील व्यक्ती ज्यांचा महिन्यातून क्वचितच वाहन वापरतात. अशा वाहनधारकांना विमा प्रीमियममध्ये सवलत मिळावी, यादृष्टीने विमा नियामकाने 'पे ॲज यू ड्राईव्ह' या विशेष पॉलिसीला परवानगी दिली आहे. जर गाडी कमी चालवली तर कार इन्शुरन्सचा प्रीमियम देखील कमी भरावा लागेल या सोप्या पद्धतीने 'पे ॲज यू ड्राईव्ह' ची पॉलिसी काम करते. अर्थात एखाद्या वाहनधारकाला खात्री असेल की वर्षभरात गाडीचा सरासरीपेक्षा कमी वापर कमी होणार आहे. तर तो 'पे ॲज यू ड्राईव्ह' या पॉलिसीमध्ये प्रीमियमवर डिस्काउंट मिळवू शकतो. इतर सर्वसाधारण कार इन्शुरन्सच्या तुलनेत 'पे ॲज यू ड्राईव्ह' पॉलिसीचा प्रीमियम हा कमी असतो.
'पे ॲज यू ड्राईव्ह' पॉलिसीमध्ये गाडी किती किलोमीटर चालली, कोणत्या श्रेणीतील कार आहे, गाडीला किती वर्ष झाली आणि कव्हरेज पातळी या घटकांचा देखील विचार केला जातो. त्यामुळे गाडीचा किमान वापर करणाऱ्या वाहनधारकांना 'पे ॲज यू ड्राईव्ह' कार इन्शुरन्स फायदेशीर ठरु शकतो. वर्षभरात गाडी कमी चालली असेल तर 'पे ॲज यू ड्राईव्ह' पॉलिसीचे नुतनीकरण करताना प्रीमियममध्ये 5% ते 25% पर्यंत डिस्काउंट मिळण्याची शक्यता आहे. 'पे ॲज यू ड्राईव्ह' पॉलिसी दोन पर्यायात सध्या उपलब्ध आहे. पहिल्या प्रकारात किती किलोमीटर गाडी चालली यावर पॉलिसीचा प्रीमियम ठरतो. दुसऱ्या प्रकारात किती दिवसांसाठी पॉलिसी हवी आहे त्यानुसार इश्यू केली जाते.
'पे ॲज यू ड्राईव्ह' पॉलिसी कसे काम करते
'पे ॲज यू ड्राईव्ह' पॉलिसीमधील किलोमीटर बेस्ड प्लॅनमध्ये गाडी किती चालली हे तपासण्यासाठी विमा कंपन्या कारमध्ये किंवा मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये ट्रॅकिंग डिव्हाईस ठेवतात. विमा कंपन्यांकडून हे डिव्हाईस मोफत दिले जाते. या ट्रॅकिंग डिव्हाईसवर केवळ गाडी किती किलोमीटर चालली हे कळेच पण आपण कशा प्रकारे वाहन चालवता याचीही नोंद या डिव्हाईसमध्ये घेतली जाते. त्यामुळे वाहनधारकाची ड्राईव्हींग शैली देखील यामध्ये तपासली जाणार आहे. किलोमीटरवर आधारित हा प्लॅन सर्वसाधारणपणे 2500 किमी प्रती वर्ष याप्रमाणे सुरु होतो. यात 5000 किमी, 7500 किमी, 10000 किमी अशा टप्प्याची विमा पॉलिसी इश्यू केली जाते. यात निर्धारित किलोमीटर देखील गाडीने वर्षभरात पूर्ण केले नाही तर वाहनधारकारला वर्षअखेर 25% पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.
'पे ॲज यू ड्राईव्ह' पॉलिसी कोणत्या कंपन्या इश्यू करतात
'पे ॲज यू ड्राईव्ह' या पॉलिसीची सध्या मार्केटमध्ये एचडीएफसी अर्गो आयसीआयसीआय लुंबार्ड, झुनो जनरल इन्शुरन्स, एको जनरल इन्शुरन्स, डिजिट जनरल इन्शुरन्स आणि न्यू इंडिया जनरल इन्शुरन्स या कंपन्यांकडून विक्री केली जाते.