महागाईची झळ सर्वच क्षेत्रात दिसून येत असली तरीही ऑटोमोबाईल क्षेत्रावर याचा फारसा परिणाम झाल्याचा दिसून येत नाही. जून महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये 2.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून महिन्यात 3.27 लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. त्याच प्रमाणे दुचाकीचीही विक्री 1.7 टक्क्यांनी वाढून तब्बल 13.30 लाख दुचाकी विकल्या गेल्या आहेत. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स ( SIAM) ने बुधवारी याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे.
यंदा दुचाकी विक्रीमध्ये 11 टक्के वाढ
Society of Indian Automobile Manufacturers (SIAM) च्या अहवालातील आकडेवारीनुसार या वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीत एकूण 9,95,974 प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. तर मागील आर्थिक वर्षातील या तिमाहीत एकूण 9,10,495 प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. या आकडेवारीच्या तुलनेत या तिमाहीत 9 टक्के वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे दुचाकीच्या विक्रीचाही आकड्यातही मोठी वाढ झाली आहे. जून अखेरच्या तिमाहीत एकूण 41,40,964 दुचाकीची विक्री झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील जूनच्या तिमाहीत 37,24,533 दुचाकी विकल्या गेल्या होत्या. या तुलनेत यावर्षी दुचाकी विक्रीमध्ये 11 टक्के वाढ झाली आहे.
तीन चाकी वाहनांची जून मधील विक्री दुप्पट
जून महिन्याचा विचार केला असता दुचाकी विक्रीत 2 टक्क्यांनी वाढून 13,30,826 युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 13,08,764 युनिट्स विक्री झाली होती. तसेच प्रवासी वाहनांचीही 3.27 लाख युनिट्सची विक्री झाली आहे. तीन चाकी वाहनांची विक्री जून 2022 मध्ये 26,701 युनिट्स होती. त्या तुलनेत जूनमध्ये 2023 मध्ये 53,019 युनिट्सची विक्री म्हणजे जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. एप्रिल-जून या तिमाहीत तीनचाकी वाहनांची विक्री ही 1,44,475 युनिट्सवर पोहोचली असल्याची माहिती SIAM चे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी दिली आहे.
मान्सूनवर अर्थव्यवस्थेचे गणित
देशात मान्सून सर्वदूर पोहोचला आहे. येत्याकाळात चांगला पाऊस झाल्यास महागाई कमी होईल,तसेच अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेगदेखील कायम राहिल. त्यामुळे वाहननिर्मिती क्षेत्रालाही गती मिळेल, अशी अपेक्षाही अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केली.