लोकल ट्रेननंतर मुंबईकरांसाठी स्वस्तात मस्त प्रवास देणाऱ्या बेस्ट बसच्या प्रशासनाने कागदी तिकीटे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या या निर्णयामुळे प्रवाशांना फक्त चिल्लरच नाही तर पैसेही बाळगण्याची गरज पडणार नाही. प्रवाशी मोबाईलमधील ॲपद्वारे ऑनलाईन तिकीट काढू शकणार आहेत. याचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच, ज्येष्ठ नागरिक, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, महिला अशा सर्वांनाच होणार आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यामुळे कागदी तिकिटाच्या खर्चावर होणारे बेस्टचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत.
बेस्ट प्रशासनाने मुंबईकरांसाठी खूप चांगले निर्णय घेतले आहेत. त्यात बेस्ट मुंबईकरांकडून किमान अंतरासाठी फक्त 5 रुपये तिकीट भाडे घेत आहे. तर एसी बससाठी अवघे 6 रुपये घेत आहे. त्याचबरोबर बेस्ट प्रशासनाने आता तिकीटांवर पंच करून देण्याची जुनी पद्धत पूर्णपणे बंद केली आहे. सध्या प्रवाशांना मशीनच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने प्रिटिंग करून तिकीट दिले जात आहे. त्याचबरोबर बेस्ट प्रशासनाने चलो कार्ड (Best Chalo Card)च्या माध्यमातून प्रवाशांची सुट्ट्या पैशांची अडचण दूर केली आहे. तर चलो ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना कार्डदेखील बाळगण्याची गरज नाही.अशा नवनवीन पद्धतीने बेस्ट प्रशासन कात टाकत असताना आता बेस्टने आणखी एक पाऊल टाकत प्रवाशांना कागदी तिकीटे न देण्याचा निर्णय घेतला आहे.
Table of contents [Show]
बेस्टचा कागदी तिकिटांवर 2.5 कोटी रुपये खर्च
सध्या बेस्टच्या बसमधून प्रवाशांना ज्या माध्यमातून कागदी तिकिटे दिली जात आहेत. त्यासाठी बेस्टला वर्षामागे 2.5 कोटी रुपयांचा खर्च येतो. सध्या बेस्ट प्रवाशांना डिजिटल पद्धतीने तिकीट प्रिंट करून देत आहे. चलो कार्डच्या माध्यमातूनही प्रवाशांना तिकीट प्रिंट करून दिले जात आहे. पण आता यापुढे बेस्टने कागदी तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बेस्टचा तिकिटांच्या कागदावर होणारा कोट्यावधी रुपयांचा खर्च वाचणार आहे.
प्रवाशांचा फायदा काय!
मुंबईकर हा नेहमीच घाईमध्ये असतो. त्यामुळे तिकिटांसाठी सुट्टे पैसे बाळगणे, नेमके पैसे जवळ ठेवणे, तसेच गर्दीमध्ये पैसे देऊन काढलेले तिकीट सांभाळून ठेवणे, याची प्रवाशांना कसरत करावी लागते. त्याच चुकून तिकीट गहाळ झाले तर तिकीट तपासणीकडून दंड आकारला जातो. अशा सर्व समस्यांवर बेस्टने कागदी तिकीटे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना आता तिकीट काढण्यासाठी कंटक्टरला पैसे द्यावे लागणार नाहीत किंवा तिकीट सांभाळूनही ठेवावे लागणार नाही. प्रवाशांना आता मोबाईलमध्येच ऑनलाईन तिकीट दिले जाणार आहे.
30 ते 35 लाख मुंबईकरांची लाईफलाईन
सध्याच्या घडीला दररोज 30 ते 35 लाख मुंबईकर बेस्टच्या बसने प्रवास करत आहेत. बेस्ट प्रशासनाने बसचा तिकीट दर अगदी किमान ठेवला असून, त्याचबरोबर प्रवाशांसाठी बेस्ट एसी बसेस सुद्धा सुरू केल्या आहेत. या बसेसना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचे किमान तिकीटभाडे सुद्धा इतर बसेसपेक्षा खूपच कमी आहे. त्यात आता बेस्ट इलेक्ट्रीक बससेवा देखील सुरू केली आहे. त्यामुळे बेस्ट एकेक पाऊल पुढे टाकत प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे.
चलो स्मार्ट कार्ड काय आहे?
बेस्ट प्रशासनाने 'चलो कार्ड' आणि 'चलो ॲप'च्या माध्यमातून प्रवाशांसाठी डिजिटल सेवा उपलब्ध करून दिली. चलो कार्डद्वारे प्रवाशी कार्डमध्ये ठराविक रक्कम भरून त्याद्वारे बेस्टच्या कोणत्याही बसने प्रवास करून तिकीट घेऊ शकतात. यासाठी प्रवाशांना रोख पैसे किंवा नेमके सुट्टे पैसे सोबत ठेवण्याची गरज नाही. कार्डमध्ये असलेल्या रिचार्जद्वारे प्रवासी तिकीट काढू शकतात. या कार्डची किंमत 50 रुपये असून त्यात प्रवाशी त्यांच्या गरजेनुसार रिफिल करू शकतात.
तसेच प्रवाशी चलो ॲपच्या माध्यमातूनही बेस्टने प्रवास करू शकतात. यासाठी प्रवाशांना प्रत्यक्ष तिकीट बाळगण्याचीही आवश्यकता नाही. मोबाईल ॲपमधून प्रवासी क्यूआर कोडद्वारे डिजिटल तिकीट काढू शकतात. ज्याची प्रिंट काढणे गरजेचे नाही. ते प्रवाशाच्या मोबाईलवर उपलब्ध असते. या दोन्ही पद्धतीद्वारे प्रवासी मोबाईल पास, मोबाईल तिकीट असा कोणताही पर्याय निवडू शकतात.
चलो ॲपच्या माध्यमातून प्रवासी तिकिटांसोबत बसचा लाईव्ह ट्रॅकसुद्धा ठेवू शकणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना बसचे लोकेशन कळण्यास मदत होते. अशाप्रकारे बेस्ट प्रशासन प्रवाशांना अत्याधुनिक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे.