Pandharpur Wari: महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायासाठी पंढरपूर वारी हा एक मोठा उत्सव असतो. पताका हातात घेतलेले वारकरी, टाळ मृदंगाचा गजर, डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला, भजनी मंडळी 20 दिवसांच्या पायी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात. राज्यभरातील छोट्या-मोठ्या दिंडी आळंदीत येऊन ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभागी होतात. (Dindi procession in Pune) एका दिंडीत शेकडो वारकरी असतात. या दिंडीचं आर्थिक गणित समजून घेऊया.
गावोगावच्या दिंडी कशा तयार होतात
एकाच परिसरातील दहा-बारा गावांची मिळून एक मोठी दिंडी असते. या दिंडीचं सगळं नियोजन दिंडी मालक करतो. त्यास फडकरी म्हटले जाते. हे फडकरी सहसा त्या भागातील प्रतिष्ठित किर्तनकार, महाराज असतात. त्यांचे आळंदी, पंढरपूर येथे मठही असतात. मोठ्या दिंडीत सर्वसाधारणपणे हजार-दीड हजार वारकरी असतात त्यांना भजनी असेही म्हणतात. लहान दिंड्यांमध्ये 100 ते 300 वारकरी असतात.
दिंडीचं आर्थिक गणित
वारीचा प्रवास 20 दिवसांचा असल्याने दिंडीचे सर्व सामान ट्रक, टेम्पोमध्ये बरोबर आणण्यात येतं. (Dindi procession Trucks) मोठ्या दिंडीकडे सर्वसाधारणपणे ट्रक, टेम्पो मिळून तीन चार वाहने असतात. यामध्ये प्रामुख्याने किराणा सामान, भांडी, मुक्कामाच्या ठिकाणी पालं (तंबू) बांधण्यासाठी तळवट, बांबू, सामानाच्या पिशव्या ट्रकमध्ये असतात. दिंडी मालकासह काही वारकरी या सामानाच्या ट्रकसोबत असतात. दिंडी सुरू होण्यापूर्वीच किराणा माल आणि इतर अत्यावश्यक सामानाची खरेदी केली जाते.
दिंडीसाठी पैशांची व्यवस्था कशी होते?
दिंडीला 20 दिवसांच्या प्रवासासाठी लाखो रुपयांची आवश्यकता असते. दिंडीमध्ये किती वारकरी आहेत यावर ही रक्कम कमी होऊ शकते. दिंडी निघण्यापूर्वी गावातील दानशूर व्यक्ती, उद्योजक, व्यापारी दिंडीसाठी वर्गणी देतात. दिंडी मालक महाराजांचा जेवढा मोठा संपर्क तेवढा जास्त निधी जमा होतो. त्यासोबतच वारकऱ्यांकडून सुमारे 1000 रुपये दिंडी सुरू होण्यापूर्वी घेतले जातात. या सर्व पैशांतून आधी सामानाची खरेदी केली जाते.

वाटेत ज्या गावात दिंडीचा मुक्काम असेल तेथे वारीतील महिला स्वयंपाक करतात. पुरुषही स्वयंपाकास मदत करतात. स्वयंपाकासाठी लागणारे पीठ, साखर तेलासह सर्व सामान वजन करून घेतले जाते. त्यासाठी एक वजनकाटाही ट्रकमध्ये असतो. सामान किती लागले हे एका वहीत लिहून ठेवले जाते. वारकऱ्यांच्या जेवणाच्या पंगतीचा खर्च भाविकांकडून उचलण्यात येतो. भाविक दिवसानुसार पंगती वाटून घेतात. जेवणासाठी झालेला हा खर्च नंतर पंगत घालणाऱ्याकडून घेतला जातो.
ह. भ. प धोंडूजीबुवा परीट चिझघरकर ट्रस्ट दिंडी
महामनीने पुण्यातील भवानी पेठ येथे जाऊन ज्ञानेश्वर महाराज पालखीमध्ये सहभागी झालेल्या दिंडी मालकाशी संवाद साधला. या दिंडीचे नाव वै. ह. भ. प धोंडूजीबुवा परीट चिझघरकर ट्रस्ट असे आहे. ही दिंडी चालू वर्षी ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या मागे 18 व्या क्रमांकावर आहे. या दिंडीचे चालक शामराव गव्हाणे यांच्याशी महामनीच्या प्रतिनीधीने संवाद साधला.
या दिंडीमध्ये 300 वारकरी आहेत. सोबत दोन ट्रक आणि एक पिकअप टेम्पो आहे. यामध्ये तंबू म्हणजेच पाल ठोकण्यासाठी बांबू, तळवट, किराणा सामान भांडी आणि इतर वस्तू आहेत. 300 वारकऱ्यांचा एका दिवसाचा जेवणाचा खर्च 16 हजारांपेक्षा जास्त असल्याचे शामराव गव्हाणे यांनी सांगितले. शामराव हे रिझव्ह बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क या पदावरून 2003 साली निवृत्त झाले आहेत.

“20 दिवसांच्या दिंडीसाठी आम्हाला 5 लाखांपेक्षा जास्त खर्च येतो. दिंडीसाठी गावातील दानशूर व्यक्ती, व्यावसायिक आणि भक्त वर्गणी देतात. तसेच वारकऱ्यांकडूनही हजार पाचशे रुपये भिशीच्या स्वरुपात जमा करतो. दिंडीसोबत येणाऱ्या ट्रक चालकांचा पगार, इंधनाचा खर्च, तंबू ठोकण्यासाठी चार माणसांचा पगार, गॅस असा खर्च आम्हाला असतो. ट्रक चालकाला 12 हजार रुपये पगार देतो. तंबू उभारणाऱ्या 4 जणांना प्रति व्यक्ती 10-12 हजार रुपये पगार द्यावा लागतो” असं त्यांनी सांगितलं.
पंढरपूर वारीसाठी संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीमागे मिळून शेकडो लहान-मोठ्या दिंड्या राज्यभरातून येतात. मोठ्या दिंडीचा खर्च 15 लाखांपेक्षा जास्तही असतो. तर लहान दिंड्यांचा खर्च 5 लाखांच्या दरम्यान असतो. वारी मार्गात जेथे मुक्काम असेल तेथे तंबू ठोकून राहण्याची व्यवस्था केली जाते. तसेच तेथे स्वयंपाकही केला जातो.
परभणीतील सेलू येथील ह. भ. प सोनवणे महाराज यांची दिंडी
मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातील सेलू येथून ह. भ. प सोनवणे महाराज यांची दिंडी ज्ञानेश्वर माऊली पालखीमागे आहे. या दिंडीत हजार पेक्षा जास्त वारकरी आहेत. यातील रामभाऊ कदम राहणार भिसे गाव यांच्याशी महामनीने संवाद साधला. रामभाऊ कदम यांचे वय 80 पेक्षा जास्त आहे. या वारीत सहभागी होण्यासाठी वारीमालकाकडे 1000 रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय इतर दुसरा मोठा खर्च करावा लागत नाही. वारीत येताना दीड-दोन हजार रुपये सोबत घेतल्याचं, त्यांनी सांगितले. 75 पेक्षा जास्त वय असल्याने पंढरपूरहून माघारी एसटीबसने ही मोफत प्रवास होतो, असं ते म्हणाले.
वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर जेवण, नाष्टा, पाणी, निवारा या सुविधा मिळत असल्याने वारकऱ्यांचा जास्त खर्च होत नाही. त्यामुळे अनेकजण जास्त पैसे सोबत ठेवत नाहीत. तसेच वारीत चोरी होण्याचीही भीतीही असते. त्यामुळे वारकरी सर्व पैसे एकाच ठिकाणी ठेवत नाही. बरोबर आणलेल्या बॅगमध्ये, खिशात, चोर खिसा किंवा पाकिटात ही रक्कम अनेकजण ठेवतात.
वैद्यकीय सेवा, पाणी, नाष्टा मोफत
वारी ज्या गावात जाते तेथे भाविकांकडून वारकऱ्यांची सोय करण्यात येते. नाष्टा, पाणी दिले जाते. तसेच वारीसोबत अनेक स्वयंसेवी संस्थांची मदतही असते. आजारी पडल्यास किंवा जखमी झाल्यास वैद्यकीय मदत मोफत असते. पुण्यामध्ये अनेक स्वयंसेवी संस्थाकडून वारकऱ्यांना विविध प्रकारची मदत पुरवण्यात आली. मोफत डोळे तपासणीचे शिबिरही होते. तसेच वारकऱ्यांसाठी जेवण, नाष्टाच्या पंगतीही ठेवण्यात आल्या होत्या.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            