Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Part-time job scam : पार्ट टाइम जॉबचं आमिष दाखवून ऑनलाइन चोरट्यांनी लुबाडले 96 लाख रुपये

Part-time job scam : पार्ट टाइम जॉबचं आमिष दाखवून ऑनलाइन चोरट्यांनी लुबाडले 96 लाख रुपये

Part-time job scam : पार्ट टाइम जॉबचं आमिष दाखवून एका गृहस्थाला पुण्यात फसवण्यात आलंय. थोडी नाही तर तब्बल 96 लाख रुपयांची रक्कम या व्यक्तीला गमवावी लागलीय. यासंबंधी आता व्यक्तीनं पोलिसांत धाव घेतलीय.

ऑनलाइन जॉबच्या (Online job) जाहिरातींचा सोशल मीडियावर सुळसुळाट झालाय. ऑनलाइन काम करून किंवा पार्ट टाइम जॉब करून भरभक्कम पैसे कमावण्याच्या अशा या जाहिरातींना अनेकजण बळी पडत आहेत. असाच एक प्रकार पुण्यात झालाय. एका 56 वर्षीय जाहिरात चित्रपट निर्मात्याची फसवणूक (Cheated) करण्यात आलीय. पुणे टाइम्स मिररनं याविषयीचं वृत्त दिलंय. सायबर चोरांनी 25 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान संबंधित व्यक्तीची 96.57 लाख रुपयांची फसवणूक केलीय. ही व्यक्ती बावधन-एनडीए रस्त्यावरच्या रामबाग कॉलनीत राहते. या व्यक्तीला मोबाइलवर एक एसएमएस (SMS) आला. त्यात पार्ट टाइम जॉबचा उल्लेख होता. या व्यक्तीनं त्या मेसेजला रिप्लाय दिला. त्यानंतर त्याला चॅट अ‍ॅपवरच्या ग्रुपमध्ये अ‍ॅड होण्यास सांगण्यात आलं.

चांगल्या परताव्याचं आश्वासन

ग्रुपवर अ‍ॅड झाल्यानंतर सुरुवातीला विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न घोटाळेबाजांनी केला. सुरुवातीला वेलकम बोनस म्हणून 10,000 रुपयेदेखील या व्यक्तीला देण्यात आले. कॉर्पोरेट ट्रॅव्हल मॅनेजमेंट (CTM) या व्यवसायाशी संबंधित काम करून चांगला परतावा मिळेल, असं या ऑनलाइन चोरट्यांनी इसमास सांगितलं. अधिक चांगला परतावा हवा असेल तर आणखी काही टास्क पूर्ण करावे लागतील, असं सांगण्यात आलं. त्याप्रमाणे या व्यक्तीनं अनेक ट्रान्झॅक्शन केले. मात्र नंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांत धाव घेतली.

एफआयआर दाखल

यासंबंधी दाखल झालेल्या एफआयआरनुसार, चोरट्यांनी पीडित व्यक्तीला ट्रॅव्हल एजन्सीचं रेटिंग आणि रिव्ह्यू करण्याचं काम सोपवलं. त्यापूर्वी दोन हप्त्यांमध्ये 21,990 रुपये भरण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर घोटाळेबाजांनी पीडित व्यक्तीला 24,809 रुपये परत केले. नंतर स्कॅमर्सनी त्याला आठ रिव्ह्यूजसाठी 80,000 रुपये देण्यास सांगितलं. तर कमिशनसह एकूण 94,840 रुपये पीडित व्यक्तीला देण्यात आले. काही काळानंतर घोटाळेबाजांनी पीडित व्यक्तीकडे जॉबसाठी एक लाख रुपये मागितले मात्र कमिशनसह पैसे परत दिले नाहीत. या व्यक्तीनं त्यांच्याकडे ते मागितले असता घोटाळेबाजांनी 35.25 लाख रुपयांची मागणी केली. या रकमेसह चांगला परतावाही देण्याचं आमिष दाखवलं.

तब्बल 58 व्यवहार 

घोटाळेबाजांनी मागितलेली 35.25 लाख रुपयांची रक्कमदेखील या व्यक्तीनं भरली. मात्र त्यानंतरही त्याला कमिशन मिळालं नाही. त्याऐवजी अजून गुंतवणूक करण्यास सांगण्यात आलं. 61.32 लाख रुपये दुसऱ्यांदा या पीडित व्यक्तीनं ट्रान्सफर केले. मात्र तरीदेखील त्याला पैसे किंवा कमिशन मिळालं नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. पुढे जेव्हा इतर कोणतेही काम करण्यास पीडित व्यक्तीनं नकार दिला तेव्हा त्याच्याशी संपर्क तोडण्यात आला. पीडित व्यक्तीनं नेट बँकिंग, गुगल पे आणि पेटीएमच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तब्बल 58 व्यवहार केले. आता सायबर पोलीस ठाण्यात या घोटाळ्याविषयी एफआयआर दाखल करण्यात आलाय.

विविध कलमांतर्गत गुन्हा

भारतीय दंड संहिता कलम 419, 420 आणि 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 C आणि 66 (D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तक्रारीनंतर, पोलिसांनी मेसेंजर अ‍ॅप्लिकेशनला पीडित आणि घोटाळेबाज यांच्यात झालेल्या मेसेजचे डिटेल्स शेअर करण्यास सांगितलंय. बँकांनी व्यवहाराचे डिटेल्स द्यावे, ही विनंतीदेखील करण्यात आलीय.

कशी टाळावी फसवणूक?

अनेकांना आपल्या मोबाइलवर एसएमएस मिळत असतात. त्यात पार्ट टाइम जॉबचं आमिष दाखवलेलं असतं. यात अनेकजण फसले जातात. हे प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.

  • अर्ज करण्यापूर्वी कंपनीविषयीची माहिती सविस्तर पाहावी.
  • वेबसाइट्स खात्रीशीर आहे का, याची चाचपणी आधीच करा.
  • तुम्हाला दिल्या जाणाऱ्या ऑफर्स खऱ्या आहेत का, याची पडताळणी करा.
  • तुमची कोणतीही वैयक्तिक आणि आर्थिक माहिती सुरक्षित असायवी हवी. ती कोणालाही मेसेज, ई-मेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून शेअर करू नका.
  • मोबाइलवरची कोणतीही अज्ञात लिंक क्लिक करू नका.
  • पैशांची गरज असल्यानं आपण कामासाठी अर्ज करत असतो. त्यामुळे कोणालाही पैसे देऊ नका, संबंधितांकडून काहीही खरेदी करू नका.
  • काहीही संशयास्पद आढळल्यास याविषयी लगेचच तक्रार करावी.