Light Bill Fraud: सध्या वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली जात आहे. यामध्ये पूर्वी लोकांना पैशांचे, लॉटरीचे आमिष दाखवून फसवणूक केली जात होती. पण आता तर नागरिकांच्या गरजेच्या गोष्टी लक्षात घेऊन त्याद्वारे त्यांची फसवणूक केली जात आहे. नुकतीच एका 76 वर्षीय महिलेला घराचे इलेक्ट्रिसिटी बिल भरले नाही तर लाईट बंद करण्याची धमकी देत त्या महिलेच्या बॅकेतील तब्बल 9.5 लाख रुपये काढून घेतले.
डिजिटल बॅंकिंग, ऑनलाईन बॅकिंग तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड अशा वेगवेगळ्या माध्यमातून सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत आहेत. आता तर हे सायबर गुन्हेगार नागरिकांच्या जीवनावश्यक घडामोडींशी संबंधित गोष्टींमधून फसवणूक करत आहेत. ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार 76 वर्षीय महिला उषा एमएस यांना इलेक्ट्रिसिटी बिलाची रक्कम भरण्याचे सांगून एनी डेस्कच्या माध्यमातून अवघ्या 4 मिनिटांत उषा यांच्या खात्यातून भामट्यांनी 7 ट्रान्सॅक्शनच्या माध्यमातून तब्बल 9.5 लाख रुपये लंपास केले.
सायबर चोरटे असा ट्रॅप लावतात?
सायबर चोरट्यांनी सर्वप्रथम उषा यांना मोबाईलवर बिजेचे बिल लगेच भरण्यासंदर्भात मॅसेज पाठवला होता आणि बिल भरले नाही तर वीज बिल डिसकनेक्ट केले जाईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यानुसार उषा यांनी त्यांच्या मुलाच्या नावे असलेल्या फ्लॅटचे वीज बिल भरण्यासाठी विचारणा केली. तेव्हा सायबर चोरट्यांनी लगेच बिल भरण्यासाठी त्यांच्याकडे एनी डेस्कची (Any Desk) मागणी केली. या एनी डेस्कच्या माध्यमातून चोरट्यांनी त्यांच्या कॉम्प्युटरचा ताबा घेऊन त्यांच्या बॅंकेतून अवघ्या 4 मिनिटांत 7 व्यवहार करून तब्बल 9.5 लाख रुपये चोरले.
एनी डेस्क कसे काम करते?
एनी डेस्क हे एक असे अॅप आहे; ज्याद्वारे आपण दुसऱ्या संगणकाचा ताबा घेऊन, त्याद्वारे त्या कॉम्प्युटरमधील सर्व माहिती पाहू शकतो किंवा वापरू शकतो. यासाठी सायबर चोरटे लोकांना एनी डेस्क अॅप डाऊनलोड करायला सांगून त्याची रिमोट अॅक्सेस मागतात आणि त्याद्वारे त्यातून बॅंकेची गोपनीय माहिती चोरली जाते किंवा चुकीचे व्यवहार केले जातात. त्यामुळे कोणीही कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले तर ते लगेच करू नये. त्याची खातरजमा करून किंवा घरातील ओळखीच्या व्यक्तीला दाखवून त्याची प्रोसेस करायची की नाही, याचा निर्णय घ्यावा.
अधिकृत अॅपचाच वापर करावा
विजेचे बिल वेळेत भरले नाही तर वीज कापू किंवा किंवा बॅंकेचा ईएमआय आजच नाही भरला तर दंड आकारू, असे मॅसेज पाठवून सायबर गुन्हेगार लोकांना घाबरवतात. त्यात कोणी चुकून त्यांच्या मॅसेजला रिप्लाय दिला तर ते अशा लोकांना आणखीन घाबरवून लगेच पैसे भरण्याची मागणी करतात आणि यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. असे सांगून त्यांना हवी असलेली अॅप डाऊनलोड करायला सांगतात. त्यामुळे कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी अधिकृत अॅपमधून त्याची खातरजमा करून घ्यावी आणि शक्य असेल तर संबंधित विभागाशी बोलून त्याची सत्यता पडताळून घ्यावी.