Onion Price Crash: राज्यात कांदा पिकाचे भाव कोसळले असून शेतकऱ्यांना कवडीमोल दरात कांदा विकावा लागत आहे. हलक्या प्रतिच्या कांद्याचे दर 1 रुपयापेक्षाही खाली आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. काल (सोमवार) नाशिकमधील लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करत लिलाव बंद पाडले. संतप्त शेतकऱ्यांनी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कांदा पिक घेण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी 55 ते 60 हजार रुपये खर्च येत असताना भाव मात्र, मिळत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उभ्या कांद्यावर नांगर फिरवला आहे. एक एकर कांद्याचे पिक (Onion Farmer Issue) घेण्यासाठी किती खर्च येतो याची माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. औरंगाबाद जिल्ह्यातील ता. पैठण, रा. बोरगाव येथील शेतकरी विष्णू घोडके यांच्याशी आम्ही खर्चाबाबत चर्चा केली. याची त्यांनी सविस्तर माहिती दिली.

www.farmingindia.in.com
1 एकर काद्यांसाठी किती खर्च येतो ते पाहूया! (खर्च सरासरी)
शेत तयार करण्यासाठी नांगरणी - 2200 ते 2500 रुपये
नांगरणी झाल्यानंतर रोटाव्हेटर - 1600 रुपये
कांद्याचे रोप तयार करण्यासाठी खर्च - 3 किलो बियाणे प्रती एकर - 6500 रुपये 
रोपांसाठी वाफे तयार करण्यासाठी खर्च - 800 रुपये
कांद्याची लागवड - 9 हजार प्रति एकर 
खतांचा खर्च - 7 हजार रुपये किमान 
फवारणी - 3 हजार रुपये
तणनाशक किंवा खुरपणी - 2 हजार रुपये 
कांद्याची काढणी - 7 हजार ते 9 हजार 
चाळ भरण्यासाठी - 3 ते 4 हजार रुपये 
एकरी उत्पन्न 10 टन - सुमारे 200 ते 225 गोणी  
गोणीचा खर्च - 30 ते 32 रुपये प्रति गोणी - 6 हजार 400 रुपये खर्च
कांदे गोण्यांमध्ये भरण्याचा खर्च - मजूरी 2 हजार रुपये 
मार्केटमध्ये नेण्यासाठी खर्च - 30 रुपये प्रति गोणी - 6 हजार रुपये  
इतर खर्च - 2500 अंदाजे  
अशा प्रकारे कांदा उत्पादनासाठी प्रति एकर 55 ते 60 हजार रुपये खर्च येतो. घरगुती मनुष्यबळ असेल तर खर्चात कमी जास्त होऊ शकते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता मजूरांद्वारेच शेतीची कामे करून घ्यावी लागत आहे. आणि मजुरांचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
70 गोणी कांदा उकिरड्यावर फेकून दिला
कांद्याला भाव नसल्याने शेतकरी विष्णू घोडके हतबल झाले आहेत. त्यांनी स्वत: 70 गोणी कांदा उकिरड्यामध्ये फेकून दिला. एकरी 60 हजार रुपयापर्यंत खर्च करुन शेतकऱ्यावर कांदा फेकून देण्याची वेळ येत आहे. काही शेतकरी उभ्या पिकात नांगर फिरवत असल्याचेही विष्णू यांनी सांगितलं. यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा दिसून येत आहे. सरकारच्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
17 गोण्या कांदे विकूनही उत्पन्न मायनसमध्ये

सोलापूरमधील शेतकरी बंडू भांगे यांनी या महिन्याच्या सुरुवातीला 17 गोण्या कांदे सोलापूर बाजार समितीमध्ये विक्रीस आणला होता. या 17 गोणी कांद्याची पट्टी 825 रुपये इतकी आली. मात्र, खर्च 826.46 इतका झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे बिल मायनसमध्ये गेले. शेतकऱ्यालाच एक रुपया व्यापाऱ्याला दावा लागला. सोलापूर येथील दुसऱ्या एका शेतकऱ्याला 10 गोणी कांदे विकल्यानंतर 2 रुपयांचा चेक मिळाल्याची बातमीही ताजी आहे. यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा दिसून येत आहेत.
नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरू
अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाने कांद्याच्या भावाबाबत विषय मांडला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, नाफेडने कांद्याची खरेदी सुरू केली आहे. नाफेडने लाल कांद्याची खरेदी सुरू केली आहे. 2.38 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी सरकारने केली असून. याबाबत शेतकऱ्यांना अजूनही मदत लागल्यास सरकार करण्यास तत्पर आहे, असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी दिले.
 
 
कांद्याचे आजचे भाव
| बाजार समिती | आवक (क्विंटलमध्ये) | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | 
| लासलगाव (लाल कांदा) | 20000 | 300 | 1201 | 
| सोलापूर (लाल कांदा) | 45911 | 100 | 1400 | 
| अहमदनगर (उन्हाळी कांदा) | 37880 | 550 | 100 | 
| मुंबई मार्केट | 14162 | 600 | 1200 | 
| औरंगाबाद | 1624 | 225 | 550 | 
सोर्स- आकडेवारी महाराष्ट्र पणन मंडळ संकेतस्थळावरुन
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            