देशांतर्गत बाजारात कांद्याच्या किंमतीमधील भाववाढ रोखण्यासाठी केंद्र अॅक्शन मोडवर काम करत आहे. मागील दोन महिन्यांपासून टोमॅटोच्या किंमतींनी सर्वसामान्यांना बेजार केले आहे. त्यातच कांद्याच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने सरकारने दोन दिवसांत दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवले असून बफर स्टॉकची मर्यादा 5 लाख मेट्रिक टन इतकी वाढवली आहे.
केंद्र सरकारने शनिवारी 19 ऑगस्ट रोजी कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ केली होती. पाठोपाठ रविवारी 20 ऑगस्ट 2023 रोजी सरकारने कांद्याची बफर स्टॉक मर्यादा 5 लाख मेट्रिक टन इतकी वाढवली आहे.
केंद्र सरकारने नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झुमर फेडरेशन (NCCF) आणि नॅशनल अॅग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) या दोन संस्थांना 1 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या अतिरिक्त कांदा खरेदीबरोबरच आज 21 ऑगस्ट 2023 पासून एनसीसीएफ आणि नाफेडकडून 25 रुपये किलो दराने कांदा विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एनसीसीएफ आणि नाफेडकडून देशातील काही निवडक बाजारपेठांमध्ये कांदा 25 रुपये किलो दराने विक्री केला जाईल. त्याशिवाय काही ठिकाणी मोबाइल व्हॅनद्वारे कांदा विक्री केली जाणार आहे.
कांद्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी एनसीसीएफ आणि नाफेड या दोन्ही संस्था 1 लाख मेट्रिक टन कांद्याची अतिरिक्त खरेदी करणार आहेत. या संस्थांची कांदा विक्री केंद्रांची संख्या येत्या काही दिवसांत वाढवली जाणार आहे.
सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडे 1400 मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक आहे. कांद्याचा सरासरी भाव 29 रुपये 73 पैसे इतका आहे. दिल्लीत कांद्याचा भाव 37 रुपये किलो असून मुंबई परिसरात कांदा 34 ते 36 रुपये किलो दराने किरकोळ बाजारात विक्री केला जात आहे.