शेअर मार्केटमध्ये प्रवेश करुन एक वर्ष पूर्ण होत नाही तोच पेटीएमच्या शेअरला मोठा झटका बसला. किमान एक वर्षाचा लॉक इन पिरिए़ड संपुष्टात आल्यानंतर बड्या गुंतवणूकदारांनी पेटीएममधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने One97 Communications चा शेअरमध्ये मोठी घसरण झाली. गुरुवारी 17 नोव्हेंबर रोजी One97 Communications चा शेअर 10% ने कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सोसावे लागले.
One97 Communications मधून सॉफ्ट बँकेने 4.5% शेअर्सची खुल्या बाजारात विक्री केली.सॉफ्ट बँकेने SVF India Holding या कंपनीच्या माध्यमातून 555.67 रुपयांवर One97 Communications चे 2,933,50,000 शेअर विक्री केले. यातून 1631 कोटी काढून घेतले.यामुळे गुरुवारच्या सत्रात One97 Communications चा शेअर 10% नी कोसळला होता. आज शुक्रवारी 18 नोव्हेंबर 2022 रोजी त्यात रिकव्हरी झाली. आज बाजार बंद होताना One97 Communications चा शेअर 547 रुपयांवर स्थिरावला. तो गुरुवारच्या तुलनेत 1.33% ने वधारला.
सॉफ्ट बँक ही One97 Communications मधील दुसरी मोठी गुंतवणूकदार आहे. सॉफ्ट बँकेची One97 Communications मध्ये 17.45% हिस्सेदारी होती. ती आता 12.95% इतकी कमी झाली आहे. मात्र या निर्णयानंतर शेअरमध्ये झालेल्या मोठ्या पडझडीने गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये One97 Communications ने शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून हा शेअर एक दोन अपवाद वगळता सातत्याने घसरला आहे. आतापर्यंत या शेअरमध्ये सरासरी 75% घसरण झाली आहे.