सध्या क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढतो आहे. बँका क्रेडीट कार्डवर भरपूर ऑफर्स देत असतात, त्यामुळे अनेक बँक खातेदार क्रेडीट कार्डचा वापर करत आहेत. अनेक खातेदारांचे एकापेक्षा अधिक बँकेचे क्रेडीट कार्ड असतात.
एखाद्या क्रेडीट कार्डवर जर तुमचे काही देणे बाकी असेल आणि ही रक्कम फेडण्यासाठी जर तुम्ही नवीन क्रेडीट कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर हा लेख जरूर वाचा.
एका क्रेडीट कार्डवरून दुसऱ्या क्रेडीट कार्ड वर पैसे भरण्याची, पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी ग्राहकांना दिली जाते. चला तर जाणून घेऊयात कसे केले जाते हे काम? तुम्हांला जर नवीन क्रेडीट कार्डचा पर्याय शोधायचा असेल तर त्याआधी नवीन बँकेचे क्रेडीट कार्ड कोणकोणत्या ऑफर्स देत आहेत हे जाणून घ्या.
Table of contents [Show]
पात्रता तपासून घ्या
कमी व्याजदर आणि शिल्लक हस्तांतरणासाठी अनुकूल अटी ज्या बँका देत असतील त्यांचेच क्रेडीट कार्ड घेण्याचा विचार करा. बँकांच्या ऑफर्स तपासून त्याचा तुलनात्मक अभ्यास करा.
नव्या बँकेचे तुम्ही क्रेडिट कार्ड घेण्यासाठी जर तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असाल तरच बँक तुम्हांला क्रेडीट कार्ड देऊ करते. एकदा की तुम्हांला बँकेच्या अटी मान्य झाल्या की तुम्ही त्यासाठी बँकेला अर्ज सादर करू शकता.
क्रेडीट कार्डाचे तपशील द्या
तुम्हाला जुन्या क्रेडिट कार्ड खात्याचे तपशील आणि तुम्ही हस्तांतरित करू इच्छित असलेली रक्कम बँकेला कळवणे आवश्यक आहे. तसेच यासाठी तुम्हांला तुमचा क्रेडिट कार्ड क्रमांक, थकबाकी रक्कम आणि बँक खात्याचा तपशील क्रेडीट कार्ड देणाऱ्या बँकेला सादर करावा लागेल.
नवीन क्रेडिट कार्ड देणारी बँक तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करेल आणि तुमच्या पहिल्या क्रेडीट कार्डचे किती पैसे भरणे शिल्लक आहे, त्यावरचे व्याज किती याची माहिती घेईल. यासाठी तुमची बँक तुमच्या आधीच्या बँकेला, क्रेडीट कार्ड कंपनीशी संपर्क करून तुमच्या खात्याविषयी माहिती घेत असते.
हस्तांतरण प्रक्रिया
तुम्ही दिलेली माहिती खरी आहे किंवा नाही याची आधी पडताळणी केली जाईल. त्यांनतर तुमचा अर्ज मंजूर झाल्यास, तुम्हाला नवीन क्रेडिट कार्ड दिले जाईल. तसेच जुन्या क्रेडीट कार्डवरील शिल्लक रक्कम भरण्यासाठी तुम्हांला कुठल्या व्याजदराने पैसे दिले जाणार आहे, त्याची मुदत काय असणार आहे आदी माहिती दिली जाते. त्यानंतर तुम्ही ऑनलाइन जुन्या क्रेडीट कार्डची शिल्लक रक्कम भरू शकता. यासाठी तुम्हांला काही मदत लागल्यास तुम्ही क्रेडीट कार्ड कंपनीच्या कस्टमर केयरशी संपर्क साधू शकता.
जुने क्रेडीट कार्ड बंद करता येते का?
तुम्ही वाढते व्याजदर आणि दंड यांपासून बचाव करण्यासाठी नवे क्रेडीट कार्ड घेत असाल तर तुमचे जुने क्रेडीट कार्ड सुरु ठेवण्यात काही अर्थ नाही. वार्षिक फी असलेले क्रेडीट कार्ड जर तुम्ही वापर नसाल तर ते बंद करणेच योग्य आहे.
लक्षात ठेवा, बॅलन्स ट्रान्स्फर करण्यासाठी बँका तुमच्याकडून काही ठराविक शुल्क देखील घेत असतात. परंतु तुम्ही वारंवार असा प्रकार करत असाल तर तुमच्या सिबिल स्कोअरवर याचा परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे एकदा-दोनदाच अशाप्रकारचे क्रेडीट कार्ड ट्रान्सफर करण्याचा विचार करा.