मराठवाडा हा इतिहासात अनेक संघर्षांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा अशाच एका संघर्षाचा भाग आहे. मराठवाड्याला हैदराबादच्या निजाम साम्राज्यापासुन स्वतंत्र होऊन आज 75 वर्षे झाली आहेत. पण तरीही महाराष्ट्राच्या इतर विभागांच्या तुलनेत मराठवाडा विभाग अजूनही मागासलेला असल्याचे दिसून येते. याची बरीच कारणे आपल्याला इतिहासात दिसून येतात. ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्यासाठी जितके लक्ष मुंबई, पुणे व कोकण विभागाला दिले. तितके लक्ष मराठवाड्याला मिळाले नाही. ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे दळणवळणाची साधने, आधुनिकतेची मुल्ये, संचारसाधनांचे वारे वाहत होते हे सर्व मराठवाड्याला फार उशीर मिळाले. त्याकाळी मराठवाड्यामध्ये इतर सुविधांची फार कमी होती. शेतीपूरक धोरण, औद्योगिक विकास या सर्वांचा मागमूस ही मराठवाड्याला त्याकाळी नव्हता. पण आता या सर्व गोष्टी बदलत आहे. मराठवाडा प्रगती करत आहे. महाराष्ट्राचा नवीन आर्थिक केंद्रबिंदू बनत आहे.
मराठवाड्याचे महाराष्ट्राला लाभलेले आर्थिक योगदान
महाराष्ट्र राज्य, देशाच्या औद्योगिक उत्पादनात जवळपास 25% आणि जीडीपीमध्ये 23.2% योगदान देतो. यामुळे महाराष्ट्र भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्य पाच विभागांमध्ये विभागलेले आहे. कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. या विभागांपैकी मराठवाडा हा एक महत्त्वाचा विभाग आहे.
मराठवाड्याची 18 दशलक्ष इतकी लोकसंख्या आहे, म्हणजे राज्याच्या लोकसंख्येच्या 16.84% टक्के लोक हे फक्त मराठवाड्यात राहतात. मराठवाड्याचे एकूण क्षेत्रफळ 64,590 किमी इतके असुन, मराठवाड्याचे आठ भागात विभाजन झाले आहे छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर. छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील एक प्रमुख आणि महत्त्वाचे शहर आहे.
2012-13 या वर्षातील उत्पन्नाचा विचार करता मराठवाड्याचे दरडोई उत्पन्न (Per Capita Income) इतर विभागांपैकी फार कमी 65,930 कोटी रुपये इतके होते. तर दुसरीकडे अमरावती दुसऱ्या क्रमांकावर व तिसऱ्या क्रमांकावर नाशिक हे विभाग होते. महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्न कोकण विभागाचे सर्वाधिक आहे.
मराठवाडा विभागाचा GDP
2013-14 मध्ये आठ दुष्काळी प्रदेशापैकी एक असलेल्या मराठवाड्याचा जीडीपी 83,765 कोटी रुपये इतका होता. हा आकडा उत्तराखंड च्या GDP पेक्षा जास्त आहे (उत्तराखंड चा GDP 70,926 कोटी रुपये इतका होता)