इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये ओला कंपनी उतरली असून तामिळनाडूमध्ये दीड हजार एकर जागेवर प्रकल्प उभारणार असल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडू सरकारने ओला कंपनीचे को-फाउंडर भावीश अगरवाल यांना राज्यात गुंतवणूक करण्यास सहकार्य केले आहे. या प्रकल्पातून EV कारबरोबरच सुटे भाग, बॅटरीची निर्मिती करण्यात येणार आहे. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील ही सर्वात मोठी डील समजली जात आहे. राज्यातील कृष्णगिरी जिल्ह्यात ही जागा ओला कंपनी खरेदी करणार आहे.
कृष्णगिरी जिल्ह्यात उभारणार प्रकल्प
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांमध्ये ओलाचे सहसंस्थापक अगरवला आणि तामिळनाडू सरकारमधील उच्चपदस्थांच्या उपस्थितीत या निर्णयाची माहिती देण्यात येणार आहे. किती कोटींची गुंतवणूक होणार आहे याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. या प्रकल्पातून २०३० पर्यंत १ लाख कोटींची गुंतवणूक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कृष्णगिरी जिल्ह्यात हा प्रकल्प उभारला जाईल, अशी माहिती मिळत आहे.
कृष्णगिरी जिल्ह्यात ओला कंपनीचा आधीपासूनच पाचशे एकरमध्ये प्रकल्प कार्यरत आहे. आता यामध्ये आणखी दीड हजार एकर जमिनीवर प्रकल्प विस्तारणार आहे. येत्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिकल टू व्हिलर निर्मितीबरोबरच इव्ही कार निर्मिती करण्याकडेही ओला लक्ष केंद्रित करणार आहे. या प्रकल्पामध्येच इतर सुटे भाग निर्मिती करणाऱ्या उद्योगांना जागा देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. बॅटरी निर्मितीसाठी येथे मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
मागील वर्षी ओला कंपनीने पहिली इव्ही स्कूटर लाँच केली. तेव्हापासून कंपनीने विस्तारासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या काही वर्षात ओला स्कूटरचे अनेक मॉडेल्स बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना जगभरामध्ये प्रतिसाद वाढत आहे. केंद्र सरकारकडून प्रदूषण रोखण्यासाठी कठोर नियमावली आणण्यात येत असल्यामुळे इव्ही प्रकल्पांना मोठी संधी निर्माण झाली आहे. सरकारकडूनही प्रोडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह इव्ही निर्मितीसाठी देण्यात येत आहे.