वर्ल्ड गुंतवणूक बॅंकिंग आणि आर्थिक सेवा देणाऱ्या गोल्डमॅन सॅक्स कंपनीने मागील आठवड्यात 3200 हून अधिक कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कंपनीने त्याची अंमलबजावणी सुरू केली. यापूर्वी अॅमेझॉननेही सुमारे 18 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा केली होती. सध्या जागतिक पातळीवर मोठमोठ्या कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांना कमी केले जात आहे. ही मंदीची चाहूल असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी यापूर्वीच कंपनीच्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली.
कंपनीने विशेषकरून कोअर ट्रेडिंग आणि बॅंकिंग युनिटमधील कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. गोल्डमनच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील मंदी आणि बॅंकिंग क्षेत्रातील भयावहता दर्शवते. कारण येत्या काही दिवसांत या क्षेत्रात आणखी पडझड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोल्डमॅन कंपनीत तिसऱ्या तिमाहीपर्यंत 49 हजारांहून अधिक कर्मचारी काम करत होते. कोविडच्या काळातही कंपनीने मोठया संख्येने कर्मचाऱ्यांची कपात केली होती. दरम्यान, गोल्डमॅनचे मुख्य कार्यकारी डेव्हिड सोलोमन यांनी डिसेंबरमध्ये काही कर्मचाऱ्यांना मेमो देऊन कर्मचाऱ्यांची संख्या कमी जाईल, असा इशारा दिला होता.
गोल्डमॅनने आशियातील हॉँगकॉँग, सिंगापूर आणि चीन इथल्या ऑफिसमधील 16 खाजगी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनाही कमी केले. हॉँगकॉँगच्या रिसर्च विभागातील 8 जणांना कंपनीने कामावरू कमी केले. हळुहळू कंपनीने इतर विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याकडे लक्ष देत आहे.
याशिवाय, जागतिक पातळीवरील सिटीग्रुप, बार्कलेज् यासारख्या कंपन्यांनीही जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मॉर्गन स्टॅन्ले या कंपनीनेही एकूण कर्मचाऱ्यांपैकी 2 टक्के म्हणजे अंदाजे 1600 कर्मचाऱ्यांची कपात केली. तसेच मागच्या महिन्यात HSBC ने 200 जणांना नोकरीहून कमी केले. या मोठ्या कंपन्यांच्या निर्णयामुळे आयटी आणि फायनान्स क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची स्थिती अजून अवघड होऊ शकते. कारण बऱ्याचवेळा एखाद्या क्षेत्रातील मोठी कंपनी जो निर्णय घेते त्याचे अनुकरण त्या क्षेत्रातील मध्यम व लहान आकाराच्या कंपन्या घेऊ लागतात. त्यामुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या आणखी कमी होऊ शकते.