Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Demat Accounts Opening : डीमॅट खात्यांची संख्या वाढली, मे महिन्यात रचला विक्रम; आकडा किती?

Demat Accounts Opening : डीमॅट खात्यांची संख्या वाढली, मे महिन्यात रचला विक्रम; आकडा किती?

Demat Accounts Opening : डीमॅट खाती उघडण्याच्या संख्येनं मे महिन्यात एक विक्रमच रचलाय. याचाच अर्थ देशातल्या शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर डीमॅट खात्यांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याचं यावरून स्पष्ट होतंय.

आतापर्यंतचा आढावा घेतल्यास मे 2023 मध्ये सर्वाधिक डीमॅट खाती (Demat Accounts) उघडण्यात आली आहेत. हा आकडा तब्बल 2.1 दशलक्ष म्हणजेच 20 लाख 10 हजार डीमॅट (Dematerialization) खात्यांवर आला आहे. शेअर बाजारासाठी (Share market) हा एक चांगला संकेत मानला जात आहे. मे 2023 हा महिना देशात आतापर्यंत 20 लाख 10 हजार डीमॅट खात्यांसह सर्वाधिक डीमॅट खाती असलेला महिना ठरला आहे. पूर्ण तीन महिन्यांनंतर हा आकडा समोर आला आहे. यातून या संपूर्ण वर्षात डीमॅट खात्यांची संख्या प्रचंड वाढणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एबीपीनं यासंदर्भातलं वृत्त दिलंय.

आतापर्यंतची आकडेवारी काय?

मे महिन्यातला डीमॅट खात्यांचा आकडा 118.16 दशलक्षावर पोहोचला आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत तो 1.8 टक्के वाढ दर्शवतो. दुसरीकडे, गेल्या वर्षीच्या याच महिन्याशी त्याची तुलना केली, तर त्यात 25 टक्के वाढ दिसून येईल. एप्रिल 2023मध्ये, देशात डीमॅट खाती उघडण्याच्या दरात घट झाली होती. डीमॅट खात्यांसाठी हा महिना संथ असल्याचं दिसून आलं होतं. कारण डिसेंबर 2020नंतर डीमॅट खातं उघडण्याची सर्वात कमी संख्या असलेला हा महिना होता. एनएसडीए (National Securities Depository Limited), सीडीएसएलच्या (Central Depository Services) आकडेवारीनुसार, एप्रिल 2023मध्ये देशात केवळ 16 लाख डीमॅट खाती उघडली जाऊ शकली.

का वाढतायत डीमॅट खाती?

देशात डीमॅट खाती काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ दिसतेय. या वाढीमागे महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीय शेअर बाजारातल्या किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग होय. आर्थिक तज्ज्ञांचंदेखील हेच म्हणणं आहे. मागच्या दोन महिन्यांत शेअर बाजारात चांगला परतावा मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारदेखील हा विचार गुंतवणुकीपूर्वी करतात. अधिकाधिक किरकोळ सहभाग अधिक गुंतवणूकदारांना प्रेरित करत असल्याचं दिसतंय. डेटाही दर्शवितो, की आयपीओ मार्केट आणि दुय्यम बाजारातली कामगिरी थेट डीमॅट खाती उघडण्याशी संबंधित आहेत.

शेअर बाजार महत्त्वाचा

शेअर बाजार या सर्वांमध्ये महत्त्वाचा आहे. देशांतर्गत शेअर बाजाराच्या कामगिरीवर नजर टाकली, तर भारतीय बाजारानं एप्रिल 2023 मध्ये जागतिक बाजाराला 4 टक्क्यांनी आउटपरफॉर्म केलंय. म्हणजेच जागतिक बाजारापेक्षा भारतीय शेअर बाजारानं 4 टक्के अधिक परतावा दिलाय. मे 2023मध्ये हा परतावा 3 टक्के जास्त आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे व्याजदर स्थिर होते. त्यामुळे शेअर बाजारांची तेजी कायम राहील आणि त्याचा चांगला परिणाम शेअर बाजारावर दिसून येईल, असं विश्लेषकांचं मत आहे. या अंदाजाच्या आधारे, गुंतवणूकदार जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाती उघडत आहेत, असं दिसतंय.

डीमॅट आहे तरी काय?

डीमॅट हे एकप्रकारचं बँक खातं आहे मात्र थोड्या वेगळ्या प्रकारचं. यात शेअर्स सर्टिफिकेट, म्युच्युअल फंड्स त्याचप्रमाणे इतर सिक्युरिटीज इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं सुरक्षित असतात. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं शेअर ठेवण्याचं हे एक खातं आहे. रेग्यूलर डीमॅट खातं, रिपॅट्रिएबल डीमॅट खातं तसंच नॉन रिपॅट्रिएबल डीमॅट खातं असे तीन डीमॅट खात्यांचे प्रकार आहेत. या प्रकारच्या खात्यामुळे कागदपत्र गहाळ होण्याचा धोका कमी होतो.