महागाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच आहे. त्या प्रमाणात केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार महागाई भत्त्यामध्ये वाढ दिली जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण वेतनामध्ये 42 % महागाई भत्ता दिला जात आहे. मात्र, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचे (8th Pay commission) वेध लागले आहेत. या संदर्भात संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आठवा वेतन आयोगा संदर्भात सरकारला प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
50% होईल महागाई भत्ता-
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वर्षातून 2 वेळा जानेवारी आणि जुलैमध्ये महागाईचा दर पाहून कर्मचाऱ्यांना भत्त्यामध्ये वाढ दिली जाते. सध्य स्थितीत कर्मचाऱ्यांना 42% महागाई भत्ता मिळत आहे. पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी 2024पर्यंत हा महागाई भत्ता 50 टक्के होईल. मात्र, मागील सलग तीन वेतन आयोगात जर महागाई भत्ता 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक झाला तर वेतनाची फेररचना करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र सरकार आठवा वेतन आयोग लागू करणार का? असा प्रश्न राज्यसभा सदस्य रामनाथ ठाकूर यांनी विचारला होता.
आठव्या वेतन आयोगाचे काय?
राज्यसभेत आठव्या वेतना संदर्भात विचारण्यात आलेल्या या प्रश्नाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले आहे. केंद्र सरकारकडून सातव्या आयोगाच्या शिफारशी नुसार वेतन व भत्त्यांची फेररचना करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सध्या तरी आठवा वेतन आयोग स्थापन करण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही,असे अर्थ राज्यमंत्री चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.