सकाळच्या सत्रात शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक लाल रंगात ट्रेड करत होते. मात्र, पतधोरण जाहीर झाल्यानंतर भांडवली बाजारात किंचित तेजी पाहायला मिळाली. राष्टीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 42 अंकांनी वाढून 17,599 अंकांवर स्थिरावला. तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 143 अंकांनी वाढून 59,832 वर स्थिरावला.
बँक, रिअल इस्टेट शेअर्सची मागणी वाढली
रिझर्व्ह बँकेने आज द्विमासिक पतधोरण जाहीर केले. सलग सहा वेळा रेपो रेट वाढ केल्यानंतर आज (गुरुवार) झालेल्या बैठकीत दरवाढीला ब्रेक दिला. याचा शेअर बाजारावर काही काळ सकारात्मक परिणाम झाला. मात्र, त्यानंतर मार्केट पुन्हा खाली आले. रेपो रेट दरवाढ रोखल्याने बँक आणि बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वधारले. गृहकर्ज आणि इतर कर्ज वाढू शकतात. तसेच रेपो दरवाढ रोखल्याने गृह खरेदीकडेही कल वाढू शकतो.
टॉप गेनर्स आणि लूजर्स (Todays Top gainers and losers)
निफ्टी-50 निर्देशांकातील बजाज फायनान्स, अदानी एंटरप्रायजेस, टाटा मोटर्स, बजाज फेनसर्व्ह आणि इंडसंड बँकचे शेअर्सचा भाव वरती गेला. या कंपन्या टॉप गेनर्स ठरल्या. तर एचसीएल टेक, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, टायटन कंपनीचे शेअर्स खाली आहे. बँक निफ्टी निर्देशांकही वधारला.
काल (बुधवार) बँकांनी कर्ज वितरणाची आकडेवारी जाहीर केली होती. यामध्ये उद्योगांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्याचे समोर आल्याने बँकांचे शेअर्स वधारले होते. तसेच बँक निफ्टीमध्येही तेजी पाहायला मिळाली. ऑटो क्षेत्रातील काही कंपन्यांनाही चांगली मागणी होती. बजाज फेनसर्व्ह आणि अदानी एंटरप्राइजेस कंपन्यांचे शेअर्स सुमारे 3 टक्क्यांनी वधारले.
चौथ्या तिमाहीचे निकाल
नुकत्याच संपलेल्या 2022-23 आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल अद्याप जाहीर झाले नाहीत. तिसऱ्या तिमाहीत उद्योगांनी खराब कामगिरी केली होती. मात्र, चौथ्या तिमाहीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. टीसीएस, इन्फोसिस कंपन्यांचे निकाल चांगले येण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून कंपन्या आपला नफा-तोटा जाहीर करतील. तेव्हा बाजारातील चित्र आणखी स्पष्ट होईल.