जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि देशांतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी 29 मे 2023 रोजी शेअर मार्केटमध्ये तेजीची लाट धडकली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 500 अंकांनी वधारला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 150 अंकांनी वधारला होता.
आज सलग तिसऱ्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ झाली आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 344 अंकांच्या तेजीसह 62846.38 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 99.30 अंकांच्या वाढीसह 18598.65 अंकांवर बंद झाला. आज इंट्राडेमध्ये निफ्टीने 18641 अंकांपर्यंत मजल मारली होती. यापूर्वी निफ्टीने 18887 अंकांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर गाठला होता.
सेन्सेक्सने 63000 अंकांची पातळी आज ओलांडली होती. तो इंट्राडेमध्ये 63026 अंकांपर्यंत गेला होता. सेन्सेक्स सार्वकालीन उच्चांकी पातळीच्या तुलनेत 557 अंक दूर राहिला. यापूर्वी सेन्सेक्सने 63583 अंकांचा रेकॉर्ड स्तर गाठला होता. आज निफ्टी बँक या इंडेक्सने नवा रेकॉर्ड केला. निफ्टी बँक आज 44458 अंकांवर पोहोचला.
भारतीय बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकादारांचा गुंतवणुकीचा ओघ कायम आहे. जागतिक पातळीचा विचार केला तर सर्व जगाचे लक्ष अमेरिकेवर लागले आहे. अमेरिकेवर अभूतपूर्व कर्जसंकट आहे. येत्या 5 जून 2023 रोजी अमेरिकन सरकारला कर्ज मर्यादा वाढवण्यास कॉंग्रेस परवानगी देणार का यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी महागाईबाबत एक महत्वाचे विधान केले. महागाई कमी करण्याबाबत सरकार दक्ष आहे. महागाईवर सरकारचे लक्ष असून ती कमी करण्यासाठी प्रयत्न सुरुच राहतील, असे सीतारामन यांनी मुंबईत एका कार्यक्रमात सांगितले.
आजच्या सत्रात सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअर वधारले. ज्यात महिंद्रा अॅंड महिंद्रा, टायटन, टाटा स्टील, एचडीएफसी, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, आयटीसी, इंड्सइंड बँक, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, रिलायन्स, एलअॅंडटी, अॅक्सिस बँक, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, नेस्ले, कोटक बँक, भारती एअरटेल या शेअरमध्ये वाढ झाली.
एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रात आज नफावसुली दिसून आली.एचयूएल,टेक महिंद्रा, इन्फोसिस, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, विप्रो, मारुती, एचसीएल टेक या शेअरमध्ये घसरण झाली.आज रियल्टी क्षेत्रातील शेअर्सला चांगली मागणी दिसून आली.
रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 17 लाख कोटींवर
आजच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 17 लाख कोटींवर गेली. आज रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 0.56% ने वधारला आणि तो 2520.70 रुपयांवर गेला होता. या तेजीने रिलायन्स इंडस्ट्रीजे बाजार भांडवल 1705406.98 कोटी इतके वाढले.