क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरणाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेंच्या निर्देशानुसार आता क्रेडिट (Credit) किंवा डेबिट कार्ड (Debit Card) संबंधित नियमांमध्ये महत्वाचे बदल होणार आहेत. त्यामध्ये यापुढे कार्ड धारकांना त्यांच्या पंसतीनुसार क्रेडिट कार्ड नेटवर्कची निवड करता येणार आहे. तसेच ज्या ग्राहकांना त्यांच्या कार्डची नेटवर्क कंपनी बदलायची आहे. त्यांना देखील क्रेडिट कार्ड नेटवर्क पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून दुसऱ्या नेटवर्क कंपनीमध्ये कार्ड पोर्ट करता येणार आहे.
बँकच ठरवत होती नेटवर्क
नागरिक ज्यावेळी बँकेकडे क्रेडिट अथवा डेबिट कार्डची मागणी करतात. त्यावेळी बँकेकडून ठराविक नेटवर्क कंपन्याचे कार्ड उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये मास्टर कार्ड, व्हिसा, रुपे या सारख्या नेटवर्क कंपन्यांच्या कार्डचा त्यामध्ये समावेश असतो. बँकांचे या नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्यांशी टायअप असते. मात्र, काही वेळा संबंधित नेटवर्कची सेवा तुम्हाला आवडत नाही किंवा त्यामध्ये काही अडथळे निर्माण होतात. तसेच काही नेटवर्कच्या कार्डवर विशिष्ट ऑफर्सदेखील असतात. मात्र, तुम्हाला बँकेकडून निवडक नेटवर्कचे कार्ड दिल्याने त्या ऑफर्सचा तुम्हाला लाभ घेता येत नाही. तुम्हाला बँकेने निवडलेल्या नेटवर्कचेच कार्ड वापर करण्याचा एकच पर्याय उरत होता.
ग्राहकांना नेटवर्क निवडीचा पर्याय
भारतीय रिझर्व्ह बँकेने सूचित केलेल्या निर्देशनानुसार आता क्रेडिट (Credit)आणि डेबिट (Debit Card)चा वापर करणाऱ्या ग्राहकांना यापुढे त्यांच्या कार्डसाठी नेटवर्क निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. कार्डसाठी अर्ज करताना आता ग्राहक त्यांच्या आवडीच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्ड नेटवर्कची निवड करेल. म्हणजेच आता ग्राहक ठरवेल की त्याला कोणत्या क्रेडिट कार्ड नेटवर्कच्या सुविधेचा वापर करायचा आहे.
पोर्ट करता येणार कार्ड नेटवर्क
जर एखाद्या क्रेडिट अथवा डेबिट कार्ड युजरला संबंधित कार्ड नेटवर्कमध्ये बदल करायचा असेल तर त्याला तो करता येणे शक्य होणार आहे. समजा त्या ग्राहकाला रुपे नेटवर्क ऐवजी मास्टरकार्ड नेटवर्कची सुविधा स्वीकारायची असेल तर ग्राहकाला कार्डची मुदत संपल्यानंतर नुतनीकरणावेळी पोर्टेबिलिटीचा (Card Portability) पर्याय वापरता येणार आहे.त्यावेळी त्याच्या आवडत्या नेटवर्क कंपनीमध्ये कार्ड पोर्ट करू शकणार आहे.