Netaji Full Market: नागपूर शहरातील 'नेताजी फुल मार्केट' (Netaji Full Market) मध्ये दररोज विदर्भासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या फुलांची आवक-जावक सुरु असते. लग्न समारंभ, सण-उत्सव, धार्मिक विधी अथवा कुठलाही कार्यक्रम असो येथे फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. नागपूर शहरातील सीताबर्डी येथे 1994 पासून हे फुलांचे मार्केट अस्तित्वात आहे. हे विदर्भातील सर्वात मोठे फुल मार्केट आहे.
Table of contents [Show]
अन्य राज्यातूनही येतात फुले
नेताजी फुल मार्केटमध्ये विदर्भासह हैद्राबाद, पुणे, नाशिक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, इत्यादी ठिकाणाहून विक्रीकरीता फुले आणली जातात. सणांच्या काळामध्ये फुले मार्केटमध्ये प्रचंड वर्दळ असते. गणेशोत्सवानिमित्य मार्केटमध्ये विविध प्रकारचे फुले विक्रीकरीता उपलब्ध आहेत. तर फुलांच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याने फुलांच्या दरातही 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सद्यस्थितीतील फुलांचे दर
गणेशोत्सवानिमित्य फुलांचे दर प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पांढरी शेवंती 150 रुपये किलो, लाल शेवंती 200 रुपये किलो, पिवळ्या रंगाची झेंडूची फुले 80 रुपये किलो, केशरी रंगाची झेंडूची फुले 80 रुपये किलो, लाल रंगाचा गुलाब 400 ते 500 रुपये किलो, पिवळ्या रंगाची शेवंतीची फुले 200 रुपये किलो, नवरंग शेवंती 300 रुपये किलो, तसेच अष्टरची फुले 250 रुपये किलो, मोगरा 1200 रुपये किलो दराने विकला जात असल्याची माहिती नेताजी फुल मार्केट ठोक आणि चिल्लर फुल विक्री संघाचे अध्यक्ष विजय वंजारी यांनी दिली.
शेतकऱ्याला योग्य मोबदला नाहीच
गणेशोत्सवामुळे फुलांच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. मात्र अद्यापही फुलांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यास योग्य तो नफा दिला जात नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जरी सर्व प्रकारच्या फुलांच्या दरामध्ये 50 टक्क्यांनी वाढ झालेली असली तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. कारण, हवामानाचा अंदाज आल्याने पावसामुळे आपल्या शेतातील माल खराब होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी चार-पाच दिवसांपूर्वीच शेतातील मालाची तोडणी केली. त्यावेळी शेतकऱ्याने 15 ते 20 रुपये किलो दराने व्यापाऱ्याला फुले विकली. याच मालाची साठवणूक करुन व्यापारी वर्ग आज फुलांची विक्री करतो आहे. तसेच पावसामुळे हाताला लागला तेवढा माल शेतकऱ्यांनी आज मार्केटमध्ये आणला. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने व्यापारी वर्गालाच प्रचंड नफा मिळत आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
कोटी रुपयांची उलाढाल
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सणांच्या दिवसांमध्ये दिवसाला फुले मार्केटची उलाढाल कोटी रुपयांच्या घरात जाते. सद्य स्थितीत या मार्केटमध्ये 70 ते 80 व्यापारी आहेत. मोठ्या व्यापाऱ्यांप्रमाणेच किरकोळ फुल विक्रेत्यांनाही चांगला नफा मिळत असतो. तर, काही शेतकरी देखील येथे त्यांच्याच शेतातील माल विक्री किरकोळ स्वरुपात विक्री करतात.
ग्राहकांच्या खिशाला कात्री
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रकारची फुले महागल्याने ग्राहकांचा खिसा चांगलाच रिकामा झाला आहे. परंतु, सण आणि पूजाविधी करीता ग्राहक पैशांना अधिक महत्व न देता आनंद आणि आवड या गोष्टींना महत्व देतांना दिसून आले.