PM Gifted Green Diamond To Jill Biden: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान मोदींनी जो बायडेन यांच्या पत्नी डॉ. जिल बायडेन यांना 7.5 कॅरेटचा हिरव्या रंगाचा हिरा भेट दिला. या हिऱ्याच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. पण दोन देशांमध्ये परराष्ट्र धोरणानुसार अशा भेटवस्तू दिल्या जातात.
नरेंद्र मोदी यांनी जिल बायडेन यांना दिलेला हिरा हा अनोखा आहे. अशाप्रकारचे हिरे प्रयोगशाळांमध्ये तयार केले जातात. ते दिसायलाही खरोखरच्या नैसर्गिक हिऱ्यांसारखे दिसतात. दोन्हीची रासायनिक रचना, म्हणजेच ज्या पदार्थापासून हिरे बनवले जातात, तेही सारखीच आहे. पण प्रयोगशाळेत तयार केले जाणारे हे हिरे एक ते चार आठवड्यांत तयार होतात. ते कसे तयार केले जातात? त्यांची किंमत कशी ठरवली जाते? जाणून घेऊया सविस्तर.
Table of contents [Show]
दोन्ही हिऱ्यांमधील फरक
लाखो वर्षांच्या प्रक्रियेतून पृथ्वीच्या गर्भात नैसर्गिक हिरे तयार होतात. ते खाणकामातून बाहेर काढले जातात. तर दुसरीकडे प्रयोगशाळांमध्ये ही हिरे बनवले जातात. तयार केलेले हे हिरे दिसायला खऱ्या हिऱ्यांसारखेच दिसतात. दोघांची रासायनिक रचना देखील सारखीच आहे. परंतु, पृथ्वीच्या गर्भात नैसर्गिक हिरे तयार होण्यास जिथे लाखो वर्षांचा कालावधी लागतो. तिथे प्रयोगशाळेत तयार केल्या जाणारे हिरे एक ते चार आठवड्यांत तयार होतात आणि ते प्रमाणपत्रांसह विकले जातात.
प्रयोगशाळेत हिरा कसा तयार होतो?
नैसर्गिक हिरे कार्बनपासून बनलेले असतात. हे लाखो वर्षांमध्ये पृथ्वीच्या आत प्रचंड दाब आणि खूप उच्च तापमानात तयार होतात. त्याचप्रमाणे उच्च दाब आणि उच्च तापमानासह कृत्रिम हिरे प्रयोगशाळेत तयार केल्या जातात. यासाठी कार्बन बियाणे (पदार्थ) आवश्यक आहे. ते बियाणे मायक्रोवेव्ह चेंबरमध्ये ठेवून विकसित केले जाते. कार्बन उच्च तापमानाला गरम करून एक चमकणारा प्लाझ्मा बॉल तयार केला जातो. या प्रक्रियेत असे कण तयार होतात ज्याचे काही आठवड्यांनंतर हिऱ्यात रुपांतर होते. मग त्याला नैसर्गिक हिऱ्यांप्रमाणे पैलू पाडून पॉलिश केले जाते.
लॅब ग्रोन हिरे ओळखायचे कसे?
नैसर्गिक आणि प्रयोगशाळेत बनवलेले हिरे यांच्यात फरक करणे कठीण आहे. दोघांमधील फरक असा आहे की, प्रयोगशाळेत उगवलेल्या हिऱ्यांमध्ये नायट्रोजन नसतो, तर नैसर्गिक हिऱ्यांमध्ये नायट्रोजन असतो. यावरुनच त्याचे परिक्षण केले जाते. प्रयोगशाळेत उगवलेला हिरा खरेदी करताना GIA प्रमाणपत्र घ्यावे, जेणेकरून तुम्हाला त्याचे गुणवत्ता आणि पुनर्विक्री मूल्य मिळू शकेल. तसेच तुमची फसवणूक देखील होणार नाही.
पुनर्विक्री मूल्य (Resale Value)
परदेशातील प्रयोगशाळेत बनवलेल्या हिऱ्यांचे पुनर्विक्रीचे मूल्य 60-70 % पर्यंत आहे, कारण तेथे मागणी जास्त आहे. भारतातही मागणी वाढली, तर त्यासाठी मोठी बाजारपेठ निर्माण होऊन पुनर्विक्री मूल्य वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. बाजारात विकल्या जाणार्या हिर्यांपैकी जवळपास 30 % हिरे हे प्रयोगशाळेत तयार केलेले असतात.
हिऱ्यांच्या किमतीतील फरक
जिथे एक कॅरेट नैसर्गिक हिरा 4 लाख रुपयांना मिळेल. दुसरीकडे, लॅबमध्ये बनवलेला एक कॅरेटचा हिरा तुम्हाला 1 ते 1.50 लाख रुपयांना मिळेल. लॅब मेड हिरे स्वस्त असल्याने आज त्या हिऱ्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. लॅबमध्ये बनवलेला हिरा देखील समान रंग, समान कटिंग, समान डिझाइन आणि प्रमाणपत्रासह उपलब्ध आहे.
मोदींनी अमेरिकेच्या प्रथम नागरिक (First Lady) जिल बायडेन यांना 7.5 कॅरेटचा हिरवा हिरा भेट दिला आहे. हा हिरा इको फ्रेंडली आहे. कारण हा हिरा बनवण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेचा उपयोग करण्यात आला आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            