मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातच आता मुंबई-नागपूर या प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या (Mumbai-Nagpur Bullet Train project) प्रकल्पाला गती मिळायला सुरुवात झाली आहे. मुंबई नागपूर या 766 किमीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल(DPR)रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे या बुलेट ट्रेनने जोडल्या जाणाऱ्या शहरांच्या विकासाच्या दृष्टीने हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे.
मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रोजेक्ट
मुंबई नागपूर या बुलेटनचा प्रस्ताव 2019मध्ये सादर करण्यात आला होता. त्यानंतर या कामाच्या हवाई सर्वेक्षणासाठी देखील निधी मंजूर करण्यात आला होता. हा प्रकल्प समृद्धी महामार्गाला (Samruddhi E-way) समांतर असणार आहे. तसेच या बुलेट ट्रेनने 13 स्थानके जोडली जाणार आहेत. या प्रकल्पाच्या कामासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने डीपीआर तयार केला असून तो मंगळवारी रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्टनुसार या प्रकल्पासाठी एकूण 1.7 लाख कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. त्यानुसार प्रति किलोमीटरला 232 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
13 स्थानके प्रस्तावित-
या प्रस्तावित बुलेट ट्रेनने नागपूर, वर्धा, खापरी डेपो, पुलगाव, मालेगाव जहांगीर, जालना, कारंजा लाड, मेहकर, शिर्डी, नाशिक, छ.संभाजीनगर, इगतपुरी आणि शहापूरसह 13 शहरे जोडण्याचे प्रस्तावित आहे. या बुलेट ट्रेनची वेगमर्यादा ही ताशी 350किमी असेल. त्यामुळे देशाचे मध्यवर्ती ठिकाण असेलले नागपूर शहर ते राजधानी मुंबई या दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            