Nagpur Flood : विदर्भात परतीच्या मान्सूनने हाहाकार माजवला आहे. शनिवारी रात्री 2 ते पहाटे 5 वाजताच्या दरम्यान शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. शहरात 100 मीमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शहरातील व्यावसायिकांना ऐन सणासुदीच्या काळात आर्थिक फटका बसला आहे. तसेच सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
नागपुरात शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे मार्केट परिसरातील व्यापारी वर्ग, फुला फळांची विक्री करणारे विक्रेत यासह जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाची आढावा आपण जाणून घेऊयात...
Table of contents [Show]
शेतकऱ्यांसह व्यापारीवर्गाचे नुकसान
आज महालक्ष्मी विसर्जनाचा दिवस आहे. सणानिमित्त रात्रीपासूनच बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजी, फळ आणि फूलांची आवक झाली होती. मात्र विक्री सुरू होण्यापूर्वीच मुसळधार पावसाने सर्व शेती माल मातीमोल केला. बाजारात आलेल्या शेती मालाचे, फुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजी, फळ आणि फुलांच्या मार्केटला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. तर दुसरीकडे तसेच शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला माल देखील मार्केटपर्यंत पोहोचवण्यात अडचणी आल्याचे वृत्त आहे. याशिवाय मार्केटच्या गोडाऊन मध्ये साठवलेल्या मालात पाणी शिरल्याने फळे पालेभाज्या आणि फुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शहरातील छोट्या व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामाेरे जावे लागले आहे.
दरवाढ आणि आर्थिक नुकसान
शिवाय पावसामुळे मार्केटमध्ये शेतातील माल वेळेवर न पोहचल्याने आज भाजीपाला, फळे आणि फुलांच्या ठोक विक्रीमध्ये 15 टक्क्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच आज शहरातील रस्त्याला नदीचे स्वरुप प्राप्त झाल्याने भाजीपाला -फळे फुले विक्रेत्यांना स्टॉल लावता आले नाहीत. परिणामी ऐन सणासुदीत मार्केटमध्ये शेती मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने छोट्या व्यावसायिकांच्या धंद्याचे नुकसान झाले. याशिवाय गौरी-गणपतीच्या सणानिमित्य पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना देखील नागरिक घराबाहेर न पडल्याने फटका बसला आहे.
कोट्यवधीचा माल झाला ओला
नागपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बर्डी मार्केटमध्ये दररोज कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. परंतु, आज येथील हजारो दुकानांमध्ये पाणी साचल्याने कपडे, मोबाइल, हॉटेल, दागिने, इत्यादी व्यावसायिकांच्या मालाचे नुकसान झाले. हे नुकसान 2 ते 3 कोटी रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
संत्री आणि मोसंबी महागणार
नागपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यामधली शेती पाण्याखाली बुडाल्याने तूर, कापूस, सोयाबिन, भाजीपाला यांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच काटोल , कळमेश्वर, सावनेर इत्यादी तालुक्यातील संत्री आणि मोसंबीच्या शेतातील मालासह शेतकऱ्यांनी तोडून साठवणूक केलेल्या मालाचे देखील पावसामुळे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी तोडून ठेवलेली मोसंबी पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सद्य स्थितीत मोसंबीचे दर पडण्याची शक्यात असून आगामी काळात मोसंबीचा तुटवडा निर्माण होऊन चांगल्या मोसंबीच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
जनावरे दगावली, शेतकऱ्यांना आर्थिक फटका-
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. या शिवाय शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्रवासी वाहतुकीस फटका
चार तास मुसळधार पाऊस पडल्याने शहराला नदीचं स्वरुप प्राप्त झाले होते. नागपूरचे मुख्य बसस्थानक, मध्य रेल्वे स्टेशन येथे सुध्दा प्रचंड पाणी साचले होते. अनेक बसेस पाण्याखाली बुडाल्या होत्या. तसेच रेल्वे ट्रॅकवर पाणी जमा झाल्याने अनेक रेल्वेंचे वेळापत्रक बिघडले. संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाल्याने ऑफिसला आणि आपआपले व्यवसाय सुरु करण्यास जाणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले. तर लष्काराच्या चमूने जवळपास 450 नागरिकांना रेस्क्यू करुन बोटीद्वारे पूरामधून सुरक्षित स्थळी हालविले.
उपराजधानीला कोट्यवधीचा फटका
वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे शहरातील ऑटोचालक वर्गाला देखील त्याचा फटका बसला. वाहतूक, व्यवसाय, शेतींसह इत्यादी अनेक गोष्टींचे नुकसान झाल्याने,नागपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास 10 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.