नॅशनल बँक ऑफ अॅग्रीकल्चर अॅंड रुरल डेव्हलपमेंट अर्थात नार्बाडने भारतात पहिल्यांदाच सोशल इम्पॅक्ट बॉंडमधून 1000 कोटींचा निधी उभारला आहे. नाबार्डने इश्यू केलेल्या सोशल इम्पॅक्ट बॉंडवर पाच वर्षांसाठी 7.63% कुपन रेट निश्चित करण्यात आला होता. या बॉंडला बँका आणि प्रॉव्हीडंड फंडांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेकडून पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी यापूर्वी ग्रीन बॉंड इश्यू करण्यात आले होते. तशाच प्रकारे नाबार्डने सोशल इम्पॅक्ट बॉंड इश्यू केले आहेत. सोशल इम्पॅक्ट बॉंडमधून नाबार्डने 1041 कोटी उभारले आहेत. त्याशिवाय लवकरच नाबार्ड 2000 कोटींचा ग्रीन बॉंडचा इश्यू आणणार आहे.
नाबार्डने जारी केलेल्या निवेदनानुसार सोशल इम्पॅक्ट बॉंड्सला क्रिसील आणि आयसीआरए या पतमानांकन संस्थेने AAA मानांकन देण्यात आले आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी नाबार्डकडून सोशल बॉंडचे लिस्टींग होणार आहे.
दरम्यान, सोशल बॉंड्सवर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जादा व्याजदर देण्याची मागणी केली होती, मात्र नाबार्डच्या व्यवस्थापनाने ती फेटाळली. यामुळे संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. सेकंडरी मार्केटमध्ये पाच वर्ष मुदतीच्या बॉंडवर 7.68% ते 7.70% इतका कुपन रेट सुरु आहे.
याशिवाय वॅनिला बॉंड्चा कुपन रेट देखील नाबार्डच्या सोशल बॉंड्स आणि ग्रीन बॉंड्सच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे नाबार्डला 3000 कोटींचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी 2000 कोटींचे ग्रीन बॉंड्स इश्यू करावे लागणार आहेत.
पाच वर्षांसाठी 7.63% हा कुपन रेट आजच्या घडीला सर्वोत्तम असल्याचा दावा नाबार्ड व्यवस्थापनाने केला. सोशल बॉंड्ला बँका आणि प्रॉव्हीडंड फंडांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे नाबार्डचे अध्यक्ष शाजी के व्ही. यांनी सांगितले. ते म्हणाले की चालू आर्थिक वर्षात नाबार्ड 3 ते 4 लाख कोटी उभारेल.
पर्यावरणपूरक इंधन कार्यक्षम प्रकल्प, ग्रीन बिल्डींग्ज, एनर्जी स्टोरेज, स्मार्ट ग्रीड्स अशा प्रकल्पांना सोशल बॉंड्समधून उभारलेला निधी दिला जाणार आहे. मात्र वॅनिला बॉंड्सच्या तुलनेत जास्त कुपन रेट दिला तर नाबार्डचे बॉंडला चांगला प्रतिसाद मिळेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.