2022 या वर्षात मे महिन्यापर्यंत 16 कंपन्यांनी आयपीओ (Initial Public Offering-IPO)मधून 40,311 कोटी रूपयांचे भांडवल उभे केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 43 टक्क्यांनी वाढ झाली असून यातून 17,496 कोटी रूपये अधिक जमा झाले आहेत.
सेबी (SEBI)कडून मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षभरात आतापर्यंत 52 कंपन्यांनी आयपीओ सादर करण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स (Draft Red Herring Prospectus-DRHP) पाठवले आहेत. 2007 नंतर इतक्या मोठ्या संख्येने यावर्षी डीआरएचपी पाठवण्यात आले आहेत. 2007 मध्ये 121 कंपन्यांनी डीआरएचपी फाईल केले होते.
IPO म्हणजे काय (Initial Public Offering)
निधी उभारण्यासाठी आयपीओ प्रक्रिया कंपन्यांना फायदेशीर असतं. शिवाय यात पारदर्शकताही अधिक असते. शेअर बाजारात नोंदणी नसलेली म्हणजेच असूचीबद्ध कंपनी जेव्हा ती प्रथमच लोकांसाठी सिक्युरिटीज किंवा शेअरच्या विक्रीद्वारे निधी उभारण्याचा निर्णय घेते तेव्हा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offering - IPO) जाहीर करते. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यानंतर, कंपनी सार्वजनिकरित्या व्यापार करणारी कंपनी बनते आणि कंपनीचे शेअर्स खुल्या बाजारात मुक्तपणे व्यवहार करता येतात.
यावर्षी आयपीओद्वारे जमा झालेली एकूण रकमेत एलआयसी आयपीओचाच अर्धा हिस्सा आहे. या वर्षभरात लिस्टिंग झालेल्या 31 कंपन्यांपैकी 21 कंपन्यांमध्ये फायदा झाल्याचे दिसून आले. यातील 19 कंपन्यांचे शेअर्स नुकसानीत आहेत. म्हणजेच याचा असा अर्थ होतो की, कंपनीचे मार्केटमध्ये लिस्टिंग झाल्यानंतर या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे.
वर्षाच्या सुरूवातीच्या महिन्यातच बऱ्याच कंपन्यांनी सेबीकडे डीआरएचपी फाईल केले होते. नंतरच्या महिन्यांमध्ये याची संख्या कमी होत गेली. याचा असा अर्थ लावू शकतो की, सध्याची मार्केटची स्थिती पाहता कंपन्या रिस्क घेण्यास तयार नसल्याचे दिसून येते. या महिन्यात शेअर मार्केटमधील महत्त्वाचे निर्देशांक हे गेल्या 52 आठवड्यापेक्षा खालच्या स्तरावर पोहोचले आहेत.
2022 मध्ये जानेवारी ते एप्रिल या दरम्यान प्रत्येक महिन्यात 10 डीआरएचपी फाईल केले गेले. मे महिन्यात याची संख्या कमी होऊन 4 वर आली. जून महिन्यात आतापर्यंत 6 डीआरएचपी फाईल झाले आहेत. पण जून महिन्यात कोणत्याही कंपनीचा आयपीओ आलेला नाही. मे महिन्यात 8 कंपन्यांचे आयपीओ आले होते.
यावर्षीचा सर्वांत मोठा आयपीओ म्हणून LIC IPO ची गणना केली जाते. एलआयसीच्या इश्यूला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पण याची लिस्टिंग खूपच डाऊन झाली. लिस्टिंग नंतरही एलआयसीच्या शेअर्समध्ये (LIC Shares) मोठी घसरण पाहायला मिळाली. इश्यू प्राईसपासून हा शेअर किमान 30 टक्क्यांनी खाली आला आहे.
एलआयसी शेअर्सच्या खराब कामगिरीचा परिणाम आयपीओ मार्केटवर पडला आहे. तर दुसरीकडे युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून शेअर मार्केट सतत खाली येत आहे. यामुळे गुंतवणूकदार सावधतेने गुंतवणूक करत आहेत. म्हणूनच मे महिन्यानंतर आयपीओच्या संख्येमध्ये घट झाली आहे. जून महिन्यात तर एकाही कंपनीचा आयपीओ आलेला नाही. आयपीओ आणण्याच्या तयारीत असणाऱ्या कंपन्या मार्केटची स्थिती सुधारण्याची वाट पाहत आहेत, असं मार्केटमधील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.