शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्याला नवखे गुंतवणूकदार प्राधान्य देतात. म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक केली जाते किंवा काहीजण दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक करतात. अशा गुंतवणुकीला नियोजनबद्ध गुंतवणूक (SIP) म्हणतात. सर्वसाधारणपणे म्युच्युअल फंडात एकाच प्रकारची एसआयपी असते, असा समज आहे. मात्र एसआयपीमध्येही चार प्रकार आहेत. ते समजून घेतल्यास फंडातील गुंतवणूक सोपी होईल.
म्युच्युअल फंडांतून दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्यासाठी म्युच्युअल फंडांतील एसआयपी एक जोखीममुक्त पर्याय म्हणून ओळखला जातो. एसआयपीमध्ये गुंतवणूकदाराला त्याच्या क्षमतेएवढी ठराविक रक्कम फंड योजनेत गुंतवणूक करण्याची परवानगी देते.
Table of contents [Show]
नियमित एसआयपी
म्युच्युअल फंड योजनेतील लोकप्रिय एसआयपी म्हणजे नियमित किंवा रेग्युलर एसआयपी (Regular SIP) योजना आहे. नियमित एसआयपीमध्ये गुंतवणूकदार दर महिन्याला किंवा तिमाही स्तरावर एक निश्चित रक्कम गुंतवणूक करतो. नव्या गुंतवणूकदाराला किंवा ज्यांना दीर्घ काळात संपत्ती तयार करायची आहे अशा गुंतवणूकदारांना रेग्युलर एसआयपी करण्याची शिफारस फंड व्यवस्थापकांकडून केली जाते.
फ्लेक्झिबल एसआयपी
फ्लेक्झिबल एसआयपीच्या (Flexible SIP) माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एसआयपीची रक्कम शेअर मार्केटमधील चढ उतरांनुसार वाढवण्याची सुविधा आहे. फ्लेक्झिबल एसआयपीमधील रक्कम ही एका विशिष्ट फॉर्म्युल्याने ठरवली जाते. ज्यामुळे जेव्हा शेअर मार्केटमध्ये घसरण होते तेव्हा गुंतवणूकदारांना जास्त रक्कम गुंतवता येते आणि जेव्हा बाजार वर असतो फ्लेक्झिबल एसआयपीमुळे गुंतवणूक प्रमाण कमी करता येते.
स्टेपअप एसआयपी
स्टेपअप एसआयपी (Step-up SIP) या शब्दाचा अर्थ म्हणजे ठराविक अंतराने दरमहा गुंतवणुकीची रक्कम वाढवणे. स्टेपअप एसआयपीमध्ये गुंतवणूकदाराला एसआयपीची रक्कम वाढवण्याची परवानगी आहे. ज्यांना आपले भविष्यातील उत्पन्न वाढणार आहे, असा विश्वास आहे अशा गुंतवणूकदारांना स्टेपअप एसआयपी हा एक चांगला पर्याय आहे. गुंतवणुकीची रक्कम वाढवल्यानंतर संपत्ती निर्माण होण्यास फायदा होतो. यात सहामाही किंवा वार्षिक स्तरावर गुंतवणूक हिस्सा वाढवता येतो.
ट्रिगर एसआयपी
ट्रिगर अर्थात काही घडामोडी किंवा घटनांचा अंदाज घेत किंवा निर्देशांकांचा अंदाज घेऊन एसआयपीमधील रक्कम निश्चित करण्याची सुविधा गुंतवणूकदाराला ट्रिगर एसआयपीमध्ये मिळते. अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा ट्रिगर एसआयपीनुसार ठरवलेली एसआयपीची रक्कम स्वयंचलित पद्धतीने म्युच्युअल फंडांत गुंतवली जाते.