शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करण्यापेक्षा तुलनेने कमी जोखमीचा म्युच्युअल फंडांचा पर्याय नव्या गुंतवणूकदारासमोर ठेवला जातो. म्युच्युअल फंडांचे व्यवस्थापन तज्ज्ञ मंडळींकडून केले जाणार असल्याने यात नुकसान मर्यादित राहते. मात्र म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करताना फंड व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांकडून विविध प्रकारचे चार्जेस आकारले जातात. याची गुंतवणूकदाराला माहिती असणे आवश्यक आहे.
भारतात सर्वसाधारणपणे म्युच्युअल फंड योजना आणणाऱ्या कंपन्या गुंतवणूकदाराला सुरुवातीला आणि वार्षिक स्तरावर शुल्क आकारतात. यात एंट्री लोड, एक्झिट लोड, व्यवहार शुल्क, एक्सपेन्स रेशो अशा प्रकारचे शुल्क आकारले जाते. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना किंवा पैसे काढताना चार्जेस किती आकारले जातात हे पाहणे गरजेचे आहे.
Table of contents [Show]
एंट्री लोड
एंट्री लोड अर्थात म्युच्युअल फंड योजनेत सुरुवातीलाच होणाऱ्या गुंतवणुकीवर कंपनीकडून एंट्री लोड आकारला जातो. म्युच्युअल फंड कंपनीसाठी फंड योजनेच्या वितरणासाठी होणारा खर्च काही प्रमाणात वसूल करण्यासाठी गुंतवणूकदारावर एंट्री लोड आकारला जातो. मात्र सेबीच्या नियमानुसार एंट्री लोड आकारावा की नाही हे आता फंड कंपन्यांवर अवलंबून आहे. म्युच्युअल फंड उद्योगातील स्पर्धा पाहता काही कंपन्या एंट्री लोड माफ करतात.
एक्झिट लोड
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सुरुवातीलाच जसा एंट्री लोड आकारला जातो. तसाच पैसे काढताना एक्झिट लोड आकारला जातो. म्युच्युअल फंडांतील पैसे विशिष्ट कालावधीत काढले तर गुंतवणूकदाराला एक्झिट लोडचा भुर्दंड सोसावा लागतो. विशेषत: फंडात गुंतवणूक केल्यापासून एक वर्षाच्या आत पैसे काढले तर त्या रकमेवर म्युच्युअल फंड कंपन्या एक्झिट लोड वसूल करतात. म्युच्युअल फंडातील पैसे काढण्यापासून गुंतवणूकदाराला परावृत्त करण्यासाठी एक्झिट लोड हा 2 ते 3% इतका देखील असतो. सर्वसाधारणपणे एक्झिट लोड हा गुंतवणूक रकमेच्या 1% इतका असतो.
ट्रान्झॅक्शन चार्जेस
म्युच्युअल फंडांत गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदाराला एकदाच व्यवहार शुल्क भरावे लागते. 10 हजारांहून अधिक गुंतवणूक असल्यास त्यावर 100 ते 150 रुपये ट्रान्झॅक्शन चार्ज आकारला जातो. तुम्ही जर दर महिना एसआयपी करत असाल तर त्यावर देखील काही फंड कंपन्या व्यवहार शुल्क आकरतात.
एक्सपेन्स रेशो
एक्सपेन्स रेशो म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्यांकडून आकारले जाणारे वार्षिक शुल्क. म्युच्युअल फंड योजनांचे व्यवस्थापन करण्यासाठी कंपन्यांकडून हे शुल्क आकारले जाते. यात एखाद्या फंड योजनेसाठी आवश्यक मनुष्यबळ, मार्केटिंग डिस्ट्रीब्युशन, फंड मॅनेजरची फी असा खर्च एक्सपेन्स रेशोमधून वसूल केला जातो. फंड योजना चालवण्यासाठी एकूण किती खर्च आला यावरुन त्या योजनेचा एक्सपेन्स रेशो निश्चित केला जातो. सर्वसाधारणपणे एक्सपेन्स रेशो हा 0.50% ते 2.25% इतका असतो.