प्रवासाला जाण्यापूर्वी बहुतांश नागरिक तिकीटाचे आरक्षण करण्याला प्राधान्य देतात. मग तो रेल्वेचा प्रवास असो किंवा एसटी बसचा प्रवास आगावू तिकीट काढणे गरजेचे झाले आहे. प्रवाशांची हीच गरज ओळखून आता एसटी महामंडळ आणि भारतीय रेल्वेने तिकीट आरक्षणासंदर्भात एक सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार आता एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) या संकेतस्थळावरून देखील एसटीचे तिकीट बुक करता येणार आहे.
एसटी आणि रेल्वेमध्ये सामंजस्य करार
एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी महामंडळाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांना आरामदायी प्रवासासह सुलभ आणि सहज प्रवासाची सोय उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (MSRTC)कडून उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचच एक भाग म्हणून आता प्रवाशांना इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC)च्या संकेतस्थळावरून तिकीट बूक करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून या संदर्भातील सामंजस्य करार करण्यात आला आहे.
एसटीला होईल फायदा
या सामज्यस करारनुसार आता एसटी महामंडळाच्या प्रवाशांना IRCTC च्या संकेतस्थळावरुन (https://www.bus.irctc.co.in) एसटीचे तिकीट आरक्षित करता येणार आहे. त्यामुळे रेल्वे आणि एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एकाच ठिकाणी तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ होण्यास मदत होईल असा आशावाद सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे.
वेगळ्या लॉगिनची गरज नाही-
ज्या प्रवाशांकडे पूर्वीचेच IRCTC लॉगिन असेल त्यांना वेगळे खाते लॉगिन करण्याची गरज नाही. तसेच जर ग्राहकाकडे आयआरसीटीसी लॉगिन नसेल तर त्यांना आवश्यक ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक देऊन गेस्ट युजरच्या माध्यमातून लॉगिन करून एसटीचे तिकीट बूक करता येणार आहे.