केंद्र सरकाने नुकतेच घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) किमतीमध्ये 200 रुपये कपात केली आहे. त्यानंतर आता मध्य प्रदेश सरकारने जनतेला आणखी एक दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. मध्य प्रदेशातील जनतेला घरगुती गॅस सिलिंडरसाठी 450 रुपयेच मोजावे लागणार आहेत. मात्र, गॅस दरातील ही सवलत फक्त श्रावण कालावधीत भरलेल्या गॅस सिलिंडरसाठीच दिली जाणार आहे.
या ग्राहकांना मिळणार लाभ
केंद्र सरकार पाठोपाठ मध्य प्रदेश सरकारने देखील राज्यातील नागरिकांना 450 रुपयामध्ये गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह सर्वसाधारण ग्राहकांनाही मिळणार आहे. खास श्रावणासाठी हे अनुदान देण्यात आले असून ज्या ग्राहकांनी 4 जुलै 2023 ते 31 ऑगस्ट 2023 या दरम्यान सिलिंडर भरले त्यांना 450 रुपयाप्रमाणे दर आकारले जाणार आहेत.
थेट खात्यात जमा होणार रक्कम
सरकारकडून देण्यात येणाऱ्या सवलतीची रक्कम ही गॅस ग्राहकांना त्यांच्या DBT प्रणालीच्या माध्यमातून थेट खात्यावर जमा केली जाणार आहे.यामध्ये उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना त्वरीत अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे. मात्र, इतर ग्राहकांना श्रावण योजनेतील गॅस अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
केंद्र सरकारकडून देशभरातील नागरिकांना लाभ
केंद्र सरकारने 29 ऑगस्ट रोजी गॅसच्या अनुदानामध्ये 200 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तर उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना अतिरिक्त 200 रुपये म्हणजे एकूण 400 रुपये अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता 900 ते 950 रुपयांमध्ये गॅस उपलब्ध होणार आहे. तर उज्ज्वला योजनेतून 703 ते 750 रुपयांपर्यंत उपलब्ध होणार आहे. तेच मध्यप्रदेशातील ग्राहकांना हा गॅस श्रावण महिन्याच्या कालावधीत 450 रुपयांना उपलब्ध होणार आहे.