सध्या सोशल मीडियावर तरन्नुम खान हिच्या नावाची चर्चा आहे. भारतातील सर्वात मोठ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी याची प्रेयसी म्हणून तरन्नुम खान चर्चेत होती. करोडपती बार डान्सर म्हणून ती ओळखली जायची. तिचा डान्स बघायला आलेले रसिक तिच्यावर लाखो रुपयांची दौलत जादा करायचे. चला तर जाणून घेऊयात तरन्नुम खानच्या काही अपरिचित गोष्टी...
Table of contents [Show]
सुशिक्षित, होतकरू तरुणी
तरन्नुमचा जन्म 1979 साली मुंबईतच झाला. तिचे बालपण मुंबईतील अंधेरी भागात गेले. मीडिया रिपोर्टनुसार तिने कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये डिप्लोमा देखील केला होता. तरन्नुमचे वडील अंधेरी भागातच एक टपरी चालवायचे. मात्र 1992 च्या मुंबई दंगलीत तरन्नुमचे राहते घर आणि टपरी दंगलखोरांनी जाळून टाकली. आधीच बिकट अवस्थेत असलेल्या खान परिवाराला मिल्लत नगरच्या पुनर्वसन केंद्रात जावं लागलं. होतं नव्हतं ते सगळं जळून खाक झाल्यानं या परिवाराला पुन्हा मोठ्या कष्टाने संसार उभा करावा लागला. अशातच तरन्नुमच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्यांची तब्येत खालावली. घरातील आई,वडील, एक भाऊ, एक बहीण आणि एक भाची यांची सगळी जबाबदारी तरन्नुमने आपल्या खांद्यावर घेतली आणि छोट्या मोठ्या दुकानांमध्ये काम करू लागली. मात्र कमावती व्यक्ती एक आणि खाणारे लोक 6, हे गणित काही आर्थिक स्थिरता देत नव्हतं.
बनली बार डान्सर...
छोटे मोठे काम करत असतानाच तिची ओळख एका महिलेशी झाली. ही महिला बार डान्सर होती. नाकीडोळा दिसायला सुंदर असलेली तरन्नुम बार डान्सर बनू शकते असं महिलेला वाटलं. तिने तरन्नुमला ही ऑफर दिली. तरन्नुम आधीच आर्थिक विवंचनेत होती, तिने होकार दिला. घरच्यांनी सुरुवातीला मनाई केली मात्र त्यांचं मन वळवण्यात तरन्नुमला यश आलं. विले पार्लेमधील दीपा बार (Deepa Bar) येथे बार डान्स गर्ल म्हणून ती काम करू लागली. तिचं वय होतं केवळ 17 वर्षे!
अब्दुल करीम तेलगीशी ओळख
दीपा बारमध्ये अनेक व्यावसायिक, उद्योगपती, चित्रपट सृष्टीतील कलाकार, निर्माते येत असत. तरन्नुमच्या अदाकारीवर शेकडो लोक फिदा व्हायचे. तिचा डान्स बघायला मुंबई आणि मुंबईच्या बाहेरील लोक देखील गर्दी करायचे.
स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी देखील या बारमध्ये यायचा. इथेच त्याची आणि तरन्नुमची ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात देखील झालं. या प्रेमाखातर एकदा अब्दुल करीम तेलगीने तरन्नुमवर एका रात्री 90 लाख रुपयांची दौलत जादा केली होती!
तेलगीला अटक, तरन्नुम संकटात
सगळं काही सुरळीत होतं. तरन्नुमचा परिवार देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला होता. अशातच 2003 साली अब्दुल करीम तेलगीला स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणी अटक केली गेली. साहजिकच संशयाची सुई तरन्नुमकडे देखील वळली. आयकर विभागाने तरन्नुमच्या घरावर आणि दीपा बारवर छापा टाकला. तरन्नुमच्या घरातून 22 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि काही रक्कम जप्त करण्यात आली. तरन्नुमने आयकर भरला नसल्याचे स्पष्ट झाले होते.
याशिवाय कमावलेल्या पैशातून तरन्नुम क्रिकेटवर सट्टा देखील लावत असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. तरन्नुमला 2005 साली अटक केली गेली आणि 6 महिन्यानंतर तिला बेल देखील मिळाली.
सध्या तरन्नुम काय करते?
अब्दुल करीम तेलगीला अटक झाल्यानंतर तरन्नुमच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला. तिच्यावर न्यायालयीन कारवाई देखील झाली. स्टॅम्प पेपर घोटाळ्यात तिचा थेट सहभाग नव्हता. परंतु क्रिकेट सट्टा प्रकरणी तिला जेलवारी सहन करावी लागली आणि आर्थिक दंड देखील सहन करावा लागला. 30 मार्च 2005 साली तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी महाराष्ट्रात डान्स बार बंदी आणली (Dans Bar Ban). यानंतर तरन्नुमसह अनेक बारबाला बेरोजगार बनल्या. तरन्नुमने या सगळ्या घडामोडीनंतर मुंबईतील एका बांधकाम व्यवसायिकाशी विवाह केला आणि आपला संसार सुरू केला.