कोविडनंतर विविध कंपन्यांमध्ये मोठी कर्मचारी कपात सुरू आहे. अॅमेझॉन, ट्विटर, अॅक्सेंचर यासह विविध कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ देत आहेत. त्यात आता मॅक्डोनाल्ड्स (McDonald’s) कंपनीची भर पडण्याची शक्यता आहे. अद्याप कर्मचारी कपातीची कोणतीही घोषणा कंपनीनं केलेली नसली तरी या आठवड्यात यूएसमधली कार्यालयं मात्र तात्पुरती बंद होणार आहेत. गेल्या आठवड्यात यूएसमधल्या तसंच काही आंतरराष्ट्रीय कर्मचार्यांना ईमेल पाठवण्यात आलेत. या कर्मचाऱ्यांना सोमवार ते बुधवारपर्यंत घरून काम करण्यास सांगितलंय. जेणेकरून याबाबतीतला निर्णय घेता येईल, असं अहवालात म्हटलं आहे. किती कर्मचार्यांना कामावरून कमी केलं जाणार, हे अद्याप स्पष्ट नाही.
जानेवारीतच दिले होते संकेत
शिकागो इथल्या कंपनी वॉल स्ट्रीट जर्नलनं आपल्या अहवालात म्हटलंय, की 3 एप्रिलच्या आठवड्यात, संस्थेच्या भूमिका आणि निर्णयासंदर्भात कर्मचाऱ्यांशी संवाद साधू. मॅकडोनाल्ड्सनं आपल्या कर्मचार्यांना मुख्यालयातले विक्रेते आणि इतर बाहेरच्या क्लायंट्ससोबतच्या सर्व वैयक्तिक बैठका रद्द करण्यास सांगितल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. दरम्यान, यासंबंधी रॉयटरला कोणतीही प्रतिक्रिया मॅकडोनाल्डकडून देण्यात आलेली नाही. फास्ट-फूड साखळी मॅक्डोनाल्डनं जानेवारीमध्येच याविषयीचे संकेत दिले होते. अद्ययावत व्यवसाय धोरणाचा भाग म्हणून कॉर्पोरेट स्टाफिंग पातळीचं पुनरावलोकन करण्यात येणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. यामुळे काही कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागू शकते. तर कंपनीचा विस्तार म्हणून काही भागांसंबधी वेगळे निर्णयदेखील होऊ शकतात.
McDonald's temporarily shuts US offices, prepares layoff notices, Wall Street Journal reports https://t.co/WdRDv4bQ0P pic.twitter.com/3kutcerN8i
— Reuters (@Reuters) April 2, 2023
150,000पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत
आठवड्याभरात महत्त्वाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मॅकडोनाल्ड्समध्ये जागतिक स्तरावर 150,000पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी 70 टक्के अमेरिकेबाहेरील आहेत. कंपनीने फेब्रुवारीमध्ये ही माहिती दिली. या आठवड्याभरात किती कर्मचार्यांना कामावरून काढले जात आहे, यावर काहीही भाष्य केलेलं नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस केम्पझिंस्की म्हणाले, की कंपनी आपल्या कर्मचारी कपात करण्याच्या धोरणासह अवलंब करू इच्छिते. कारण पैशांची बचत करणं याला आम्ही सध्या प्राधान्य देत आहोत. त्यामुळे काही कठीण निर्णय घेणं अपेक्षित होतं, असं केम्पझिंस्की म्हणाले. आज अस्तित्वात असलेल्या काही नोकर्या एकतर हलवल्या जाणार आहेत किंवा त्याजागी इतर पदांचा विचार केला जाणार आहे.
बाजारात संमिश्र वातावरण
आर्थिक मंदीचा फटका अनेक कंपन्यांना बसला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात केली जातेय. काही कंपन्या कर्मचारी कपात करणार नसल्याचं सांगत आहेत. तर काही कंपन्या अशा मंदीच्या काळात नोकऱ्या देणार असल्याचं धाडसही दाखवत आहेत. कर्मचारी कपातीची आकडेवारी पाहिल्यास अनेकांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. अॅमेझॉननं मागच्या दोन महिन्यात 18,000हून अधिक कर्मचाऱ्यांना घरी पाठवलंय. अजूनही अनेकांना घरी पाठवण्याच्या कंपनीच्या हालचाली आहेत. एलन मस्क यांच्या ट्विटरचीही हीच अवस्था आहे. या कर्मचारी कपातीच्या बातम्या येत असताना टाटा ग्रुपनं (Tata Consultancy Services) मात्र एक पाऊल पुढे टाकलं आहे. या आर्थिक वर्षात 1.25 लाख नोकऱ्या देणार असल्याचं मागेच कंपनीनं जाहीर करून टाकलंय. मागच्या 18 महिन्यात जलद भरती केलेली नाही. त्यामुळे या आर्थिक वर्षात 1.25 ते 1.50 लाख नोकऱ्या उपलब्ध करणार असल्याचं कंपनीचे मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी नुकतंच सांगितलं.