Market Closing Bell: भारतीय भांडवली बाजार आज (गुरुवार) तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात मोठी वाढ झाली. तसेच प्रमुख 13 क्षेत्रीय निर्देशांकापैकी 12 निर्देशांकही वधारले. बजाज फायनान्स, विप्रो, टेक महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हरसह इतरही अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले. कॉर्पोरेट कंपन्यांनी चांगला नफा मिळवल्यामुळे भांडवली बाजार मंदी, भाववाढ काही काळ विसरून गेल्याचे दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 349 अंकांनी वाढून 60,649 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 109 अंकांनी वाढून 17,923.20 वर स्थिरावला. शेअर मार्केटची सुरुवात संथ झाली. मात्र, नंतर बाजाराने गती पकडली.
टॉप गेनर्स आणि टॉप लूझर्स
जीई पावर इंडिया, मँगलोर रिफायनरी, एल अँड टी टेक्नॉलॉजी, बजाज फायनान्स, Syngene International Ltd या कंपन्यांचे शेअर्स वरती गेले. तर गुजरात अल्कलाइन्स, वोल्टास, Laurus Labs Ltd, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स या कंपन्यांचे शेअर्स खाली आले.
विप्रो कंपनीने आज तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीला 3070 कोटी रुपयांचा नफा झाला. विप्रोच्या संचालक मंडळाने 445 प्रति शेअर या दराने बायबॅक ऑफरला मंजूरी दिली. गोदरेज कंन्झ्युमरने रेमंड कंपनीचा व्यवसाय 2,825 कोटींना विकत घेतला. टेक महिंद्रा कंपनीला चौथ्या तिमाहीत 1120 कोटी रुपये नफा झाला. हा नफा बाजार विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा कमी ठरला.
बजाज फायनान्सने अपेक्षेपेक्षा जास्त नफा नोंदवल्याने कंपनीचा शेअर 3% पेक्षा जास्त वधारला. बजाज फायनान्स सोबतच बजाज फेनसर्व्ह या दोन्ही कंपन्या निफ्टी निर्देशांकातील टॉप गेनर्स ठरल्या. L&T Technology कंपनीने तिमाही निकालात मजबूत नफा कमावल्याने शेअर 5% वधारले. Syngene International Ltd कंपनीने वार्षिक 21% नफ्यात वाढ नोंदवल्यानंतर शेअर्स 6% टक्क्यांनी वाढले.
अमेरिका, आशियाई बाजार कमकुवत
आज आशियाई देशांतील शेअर बाजाराची कामगिरीही कमकुवत होती. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील महागाई आणि इतर महत्त्वाची आकडेवारी नकारात्मक असल्याने बाजारातही मरगळ आली. दरम्यान, क्रूड तेलाचे भाव 80$ च्या खाली आले आहेत. परदेशी गुंतवणुकदार भारतीय बाजारात आणखी पैसा लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाले तर भारतीय मार्केट आणखी वर जाईल. संस्थात्मक गुंतवणुकदार भारतीय बाजाराबाबत आशादायी आहेत.
काल(बुधवार) मारुती सुझुकीने तिमाही निकाल जाहीर केले. मागील वर्षाच्या तुलनेत 42% जास्त नफा कमावला असला तरी आज बाजार उघडताच शेअर्स किंचित खाली आला होता. बजाज फायनान्सने चौथ्या तिमाहीत 3,158 कोटी रुपये नफ्याची नोंद केल्यामुळे कंपनीचे शेअर्स वधारले.