Majhi Kanya Bhagyashree Yojana: राज्यातील मुलींचे भविष्य उज्ज्वल व्हावे, त्यांना मनासारखे शिक्षणा घेता यावे, त्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, तसेच त्यांचा जन्मदर वाढावा, समाजात मान-सन्मान मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने दारिद्र्यरेषेखाली जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसह, दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच Above Poverty Line-APL कुटुंबात जन्मलेल्या मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री (Majhi Kanya Bhagyashree Yojana) ही नवीन सुधारित योजना सुरू केली.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा मूळ उद्देश, मुलींचा जन्मदर वाढवणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे हा आहे. यासाठी सरकारद्वारे मुलींच्या नावे बॅंकेत पैसे गुंतवले जातात. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने काही नियम घालून दिले आहेत. हे नियम काय आहेत. या योजनेचा लाभ लाभार्थी कसा घेऊ शकतील. याबाबत आपण अधिक जाणून घेणार आहोत.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ कोणला मिळू शकतो?
एका मुलीच्या जन्मानंतर आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असल्यास तसेच दोन मुलींच्या जन्मानंतर आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या जोडप्यांच्या मुलींनी या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.50 लाख रुपयांपर्यंत आहे. असे समाजातील घटक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
एका मुलीनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असेल तर, सदर मुलीच्या नावे बॅंकेत 50,000 रुपयांची मुदत ठेवी (Fixed Deposit-FD) तयार केली जाते. या रकमेवर जमा झालेले व्याज मुलगी 6 वर्षांची झाली की काढता येते. तसेच पुढील 6 वर्षांचे व्याज मुलगी 12 वर्षांची झाली की काढता येते. त्यानंतर मुलगी 18 वर्षांची झाली की, जमा केलेले 50 हजार रुपये आणि त्यावर मिळणारे व्याज अशी दोन्ही रक्कम काढता येते.
दोन मुलींच्या जन्मानंतर आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असेल तर प्रत्येक मुलीच्या नावे बॅंकेत प्रत्येकी 25,000 रुपयांची मुदत ठेव केली जाते. पहिल्या 6 वर्षात जमा होणारे व्याज मुलींच्या सहाव्या वर्षी पालकांना काढता येऊ शकते. तर पुढील सहाव्या वर्षी म्हणजे मुली 12 वर्षांच्या झाल्या की पुन्हा पालक मुदत ठेवींच्या रकमेवर जमा होणारे व्याज काढू शकतात आणि त्या मुलींच्या 18 वर्षानंतर जमा केलेली 25 हजार रुपयांची मुदत ठेव आणि त्यावर जमा होणाऱ्या व्याजाची रक्कम काढू शकतात.
योजनच्या अटी काय आहेत?
- माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2017 आणि त्यानंतर जन्मलेल्या मुलींना लागू राहील.
- योजनेचा लाभ घेताना आई/वडिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
- पहिले अपत्य मुलगा असल्यास आणि दुसरे अपत्य मुलगी असल्यास किंवा त्याच्या उलट पहिले अपत्य मुलगी आणि त्यानंतर मुलगा झाल्यास सदर जोडप्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- दोन्ही अपत्ये मुली असलेल्या जोडप्यांना, तसेच दत्तक मुलगी घेतलेल्या पालकांना या योजनेला लाभ घेता येईल.
- सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील नागिरकांनाच लागू आहे.
आवश्यक कागदपत्रे काय लागतात?
- स्थानिक तहसिलदाराचा 7.50 लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला.
- मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्याचे सर्टिफिकेट.
- मुलींच्या नावे बॅंकेच खाते सुरू करण्यासाठी पालकांची आवश्यक कागदपत्रे. उदा. फोटो, आधारकार्ड, निवासी पुरावा इत्यादी.