राज्यात मागील दोन वर्षापासून जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Disease) प्रादुर्भाव दिसून येत आहे. या आजाराने अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दगावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना आर्थिक सहाय्य (Lumpy Disease compensation) देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. एनडीआरएफच्या(NDRF) निकषानुसार ही आर्थिक मदत करण्यात येत आहे. मात्र, ज्या पशुपालकांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही अशा पशुपालकांना यापुढेही मदत देण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली.
39654 जनावरांचा मृत्यू
राज्यात लम्पी आजारामुळे (Lumpy Disease) एकूण 39654 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मात्र सरकारकडे प्राप्त आकडेवारी पेक्षा जास्त प्रमाणात जनावरे लम्पी आजाराने दगावले असल्याचा तारांकीत प्रश्न विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विचारण्यात आला होता. त्यावर पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेत माहिती देताना म्हणाले की, लम्पी स्कीन’ या त्वचा रोगामुळे मृत जनावरांच्या मालकांना याआधी जसे अनुदान दिले जात होते. त्याप्रमाणे यापुढेही अनुदान दिले जाईल.
एनडीआरएफच्या (NDRF) निकषानुसार मदत
राज्यातील लम्पी आजाराने मृत झालेल्या जनावरांच्या मालकांना एनडीआरएफच्या निकषानुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यानुसार लम्पीमुळे जनावरे मृत झाल्यास गायसाठी 30 हजार, बैलसाठी 25 हजार आणि वासरु 16 हजार याप्रमाणे मदत दिली जात आहे. ज्या पशुपालकांना अद्यापही आर्थिक मदत मिळाली नसेल तर त्यांना यापुढेही मदत दिली जाणार आहे. लम्पी स्कीनमुळे मृत जानवारांच्या मालकांना मदत करणारे हे देशातील एकमेव राज्य आहे.
तसेच लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर यावर्षीपासून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लसीकरणाबाबत केंद्र सरकारशी सामंजस्य करार केला आहे. लस तयार करण्यासाठी पुण्यातील लॅब सुरू करण्यात आली आहे.