राज्यातील औद्योगिक आणि आयटी हब असलेल्या पुणे शहरातील मेट्रो सेवेचा नुकताच विस्तार करण्यात आला. महामेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांसाठी विविध सुविधा पुरवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महामेट्रोकडून प्रवाशांच्या सोयीसाठी 'एक पुणे कार्ड' (One Pune Card) लॉन्च करण्यात आले आहे. रुपे (RuPay) योजनेवर आधारीत हे कार्ड HDFC बँकेसोबत भागीदारी करून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.या कार्डचे प्रवाशांना कोणकोणते फायदे आहेत हे जाणून घेऊयात..
काय आहेत फायदे?
पुणे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महामेट्रोकडून एक पुणे कार्ड हे प्रीप्रेड कार्ड तयार करण्यात आले आहे. प्रवाशांना या कार्डचा तिकीट काढण्यासह ऑनलाईन खरेदीसाठी देखील वापर करता येणार आहे. हे कार्ड नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) नियमान्वये HDFC बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे. या कार्डचा प्रवाशांना पुढील प्रमाणे फायदा घेता येणार आहे.
तिकिटासाठी रांगेत उभारण्याची आवश्यकता नाही
महामेट्रोने प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या कार्डचा मुख्यत्वे तिकिटासाठी वापर करता येणार आहे. या कार्डधारकांना मेट्रोने प्रवास करण्यासाठी तिकिटाच्या रांगते उभे राहावे लागणार नाही. हे एक प्रीप्रेड कार्ड आहे. त्यामुळे तुम्ही मेट्रो स्टेशनवर AFC गेटवर कार्ड स्कॅन करून तुम्ही तुमचा प्रवास करू शकता. तुमच्या कार्डमधून प्रवासाचे पैसे कापले जातील. तुम्हाला प्रत्येकवेळी तिकीट काढण्याची आवश्यकता नाही.
बस आणि मेट्रो प्रवासासाठी सर्वत्र वापर
एक पुणे कार्ड (One Pune Card)केवळ पुणे मेट्रोसाठीच मर्यादित नसून भारतातील कोणत्याही मेट्रो आणि बस सेवांमध्ये या कार्डचा वापर करता येणार असल्याचा दावा महामेट्रोकडून करण्यात आला आहे. तसेच या कार्डचा वापर करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट खर्चामध्ये 10 % सवलत दिली मिळणार आहे.
रिटेल पेमेंटसाठी वापर करता येईल
एक पुणे हे कार्ड रुपे कार्ड योजनेवर आधारीत असून या कार्डचा उपयोग तुम्ही खरेदीसाठी देखील करू शकणार आहात. विशेष म्हणजे या कार्डच्या माध्यमातून 5000 रुपयांपर्यंतचे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पीनची आवश्यकता भासणार नाही.
कुठे उपलब्ध आहे?
महामेट्रोकडून सुरुवातीला 5000 प्रवाशांना हे कार्ड मोफत उलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतरच्या प्रवाशांना मात्र हे कार्ड घेण्यासाठी 150 रुपये आणि 18 टक्के टॅक्स देऊन हे कार्ड खरेदी करावे लागेल. सध्या हे कार्ड तुम्हाला पुण्यातील कोणत्याही मेट्रो स्थानकामध्ये उपलब्ध होईल. यासह HDFC बँकेच्या संकेतस्थळावरून देखील तुम्ही या कार्डसाठी अर्ज करू शकता.