• 04 Oct, 2022 15:43

युरोप ठप्प! लुफ्थान्सा एअरलाईन्समध्ये संपाची ठिणगी, 800 फ्लाईट्स रद्द

Lufthansa Airlines Cancel Flights

Lufthansa Cancels 800 Flights: पगारवाढीसाठी वैमानिक आणि ग्राऊंड स्टाफ संपावर गेल्याने लुफ्थान्सा एअरलाईन्सला जवळपास 800 फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या आहेत. युरोप आणि उत्तर अमेरिकेतली विमान सेवा ठप्प झाली आहे.

लुफ्थान्सा या युरोपातील बड्या आणि नामांकित एअरलाईन्समध्ये संपाची ठिणगी पडली आहे. वैमानिक आणि ग्राउंड स्टाफ यांनी पगारवाढीची मागणी करत संपाची हाक दिली. संपाने कंपनीची दैनंदिन विमान सेवा पुरती कोलमडली आहे. या संपामुळे लुफ्थान्सा एअरलाईन्सला 800 फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या. यामुळे जगभरातील 1,30,000 प्रवाशांना फटका बसला आहे. विशेषत: युरोपात लुफ्थान्सा एअरलाईन्सचे मोठे नेटवर्क असून या संपाने युरोप ठप्प झाला. (Lufthansa cancels 800 flights worldwide due-to pilot strike)

संपाचे परिणाम लक्षात घेत लुफ्थान्साने जगभरातील विमान सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला.प्रवासी आणि कार्गो सेवा रद्द करण्यात आल्याचे निवेदन लुफ्थान्सा एअरलाईन्सकडून गुरुवारी जारी करण्यात आले होते. दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कंपनीला कर्मचारी संपाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी जुलै महिन्यात कंपनीच्या लॉजेस्टिक आणि टिकेटिंग विभागातील कर्मचाऱ्यांनी संप केला होता. या कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या Verdi संघटनेनं अखेर 2.5% पगारवाढीचा करार करुन संप मागे घेतला होता.मात्र या संपामुळे लुफ्थान्साला जवळपास 1000 फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या होत्या. आताही तशाच प्रकारची नामुष्की कंपनीवर ओढवली आहे.

पाच खंडांमध्ये 200 डेस्टिनेशनला विमान सेवा

जगातील सर्वात मोठी आणि नामांकित विमान कंपनी म्हणून लुफ्थान्सा एअरलाईन्स प्रसिद्ध आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पर्यावरणपूरक इंधनांचा वापर करणाऱ्या विमानांचा ताफा कंपनीकडे आहे. लुफ्थान्सा केवळ युरोपातीलच नव्हे तर जगातील प्रमुख एअरलाईन्स आहे. पाच खंडांमधील 211 डेस्टिनेशनला लुफ्थान्साची कनेक्टिव्हिटी आहे. 74 देशांमध्ये कंपनीची विमान सेवा आहे. फ्रॅंकफर्टमध्ये मुख्यालय असून उत्तर अमेरिकेतील जवळपास 20 मोठ्या शहरांना विमान सेवा पुरवते. 2021 या वर्षात कंपनीने जगभरात 4,60,029 फ्लाईट्स पूर्ण केल्या आणि यात 46.9 मिलियन प्रवाशांनी प्रवास केला. या वर्षात कंपनीचा महसूल 16.811 बिलियन युरो इतका होता. कंपनीला 2021 मध्ये 2,191 बिलियन युरोचा तोटा झाला होता. 1 जानेवारी 2022 रोजी कंपनीकडे 1,05,290 कर्मचाऱ्यांचा ताफा आहे.

Vereinigung Cockpit युनियन करतेय कामगारांचे प्रतिनिधित्व

जर्मनीतली मोठी कामगार युनियन असलेली Vereinigung Cockpit (VC) लुफ्थान्साच्या वैमानिकांचे प्रतिनिधित्व करत आहे. यापूर्वी एकदा वेतन वाढ करारावरुन कंपनी व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनेमधील बोलणी फिस्कटली होती. गुरुवारी कंपनीने दिलेली पगारवाढीची ऑफर युनियनने फेटाळून लावली होती. लुफ्थान्सा एअरलाईन्समधील 97.6% कर्माचारी आणि सभासदांनी संपाला पाठिंबा दिला आहे. संघटनेने विविध मागण्या कंपनीपुढे ठेवल्या आहेत.   

  • Vereinigung Cockpit ने लुफ्थान्साच्या वैमानिकांच्या वेतनात 5.5% वाढीची मागणी केली आहे. 
  • वेतनवाढ महागाईच्या तुलनेत स्वयंचलित पद्धतीने व्हायला हवी अशी आग्रही मागणी केली आहे. 
  • या बदल्यात कंपनीने 900 युरो पगारवाढीची तयारी दर्शवली होती. 
  • यात वरिष्ठ पायलट्ससाठी 5% आणि ज्युनियर कर्मचाऱ्यांसाठी ही 18% इतकी पगारवाढ होती. 
  • नवीन कर्मचारी भरती करण्यास कंपनी टाळाटाळ करत असल्याने वरिष्ठ कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याचा आरोप. 
  • लुफ्थान्सा समूहात सामायिक वेतन प्रणालीची मागणी. लुफ्थान्सा आणि युरोविंग्जमध्ये समान पे-स्ट्रक्चरची मागणी. 

बजेट एअरलाईन्स 'युरोविंग्ज'ची सेवा अबाधित

लुफ्थान्साला संपाचा फटका बसला असला तरी कंपनीची सहयोगी कंपनी लो कॉस्ट कॅरियर युरोविंग्जची सेवा अबाधित असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. युरोविंग्ज शेड्युलनुसार सेवा देत आहे, असे कंपनीने म्हटले आहे.  

शेकडो भारतीय प्रवाशांना बसला फटका  

लुफ्थान्सा एअरलाईन्समधील संपाचा फटका शेकडो भारतीयांना बसला आहे. आज शुक्रवारी 2 सप्टेंबर 2022 रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर लुफ्थान्सा एअरलाईन्समध्ये बुकिंग केलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी ठिय्या केला.संपामुळे फ्लाईट्स रद्द झाल्याने प्रवाशांनी पूर्ण पैसे परत करण्याची मागणी लावून धरली आहे. युरोप आणि अमेरिकेल्या जाणाऱ्या प्रवाशांना आज मनस्ताप सहन करावा लागला. फ्रॅंकफर्ट आणि म्युनिचला जाणारी दोन विमाने संपामुळे अचानक रद्द करण्यात आली. ज्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. पर्यायी व्यवस्था करावी किंवा पूर्ण पैसे परत करण्याची मागणी प्रवाशांनी यावेळी केली.

बहुतांश एअरलाईन्समधील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता

केवळ लुफ्थान्साच नाही तर युरोपातील बहुतांश एअरलाईन्समधील कमचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ऑगस्टमध्ये युरोपातील महागाईचा दर 9.1% या विक्रमी स्तरावर गेला आहे. (Eurozone Inflation rate)  मागील 25 वर्षांतील ही सर्वाधिक महागाई आहे. याआधी जुलै महिन्यात तो 8.9% होता. यामुळे युरोपीयन सेंट्रल बँकेकडून कर्ज दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. कर्जदर वाढत असल्याने कर्जदारांना कर्जफेड करण्यासाठी जादा पैशांची तरतूद करावी लागत आहे. यामुळेच एअरलाईन्स कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. लुफ्थान्साप्रमाणे इतर कंपन्यांना नजीकच्या काळात संपाला सामोरे जावे लागू शकते.  Iberia Express मधील कर्मचाऱ्यांनी 10 दिवस संपाचा इशारा दिला आहे. रोमानियाची विमान कंपनी TAROM मधील कर्मचाऱ्यांनी देखील संपावर जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे युरोपची विमान सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.