नोकरी धंद्यात स्थिरस्थावर झालं की अनेकजण कार घेण्याचा विचार करतात. बहुतांश वेळा लोन घेऊनच कार खरेदी केली जाते. यासाठी बँकांचा व्याजदर बघणे आवश्यक असते. कार घेण्यासाठी काही बँका ऑन रोड प्राईसवर देखील 100% कर्ज मंजुर करतात शून्य डाऊन पेमेंटमध्येही कार खरेदी केली जाते. कोणती बँक किती टक्के दराने व्याज देतेय ते जाणून घेऊया. (Best car loan offers by bank's)
कार घेताना आपला पगार किंवा मासिक उत्पन्न किती आहे, किती कालावधीसाठी कर्ज घ्यायचे आहे आणि यामुळे कितीचा मासिक हफ्ता बसेल, याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते. अनेकदा बँकांचे मोठ्या कार डिलर्ससोबत टायअप असते. त्यातही ग्राहकांना फायदा होतो. विशिष्ट कंपनीसोबत बँकेचा करार असल्यास स्पेशल रेटने कार लोन मिळते. त्याबाबत देखील ग्राहकांनी चौकशी करणे आवश्यक आहे.
पंजाब नॅशनल बँक | 6.65% पासून पुढे |
स्टेट बँक ऑफ इंडिया | 7.20% पासून पुढे |
कॅनरा बँक | 7.30% पासून पुढे |
आयडीबीआय बँक | 7.35% पासून पुढे (फ्लोटिंग) |
युनियन बँक ऑफ इंडिया | 7.40% पासून पुढे |
इंडियन ओव्हरसीज बँक | 7.55% पासून पुढे |
फेडरल बँक ऑफ इंडिया | 8.50% पासून पुढे |
फिक्स रेटने कर्ज घ्यावे की फ्लोटिंग रेटने?
बँकेतून कर्ज घेताना कोणत्या प्रकारच्या व्याजदराने पैसे भरायचे आहेत यासाठी ग्राहकला फ्लोटिंग रेट आणि फिक्स रेट असे पर्याय उपलब्ध असतात. सामान्यत: कर्जावरील व्याजाचे दर वाढत जातात असे आढळून येते. यामुळे फ्लोटिंग रेटचा पर्याय न स्वीकारता फिक्स रेटचा पर्याय स्वीकारणे योग्य मानले जाते. यामुळे बँकांचा व्याजाचा दर वाढला तरी मासिक आर्थिक बजेटला धक्का बसत नाही.
शून्य डाऊन पेमेंटचा पर्याय स्वीकारावा का?
कर्ज घेताना शून्य डाऊन पेमेंटवर कर्ज उपलब्ध असेल तरी तो पर्याय स्वीकारावा का याचा नीट विचार करणे आवश्यक असते.कारण डाऊन पेमेंट अजिबातचं करणार नसाल तर संपूर्ण कारच्या किंमतीवर व्याज भरावे लागेल. आणि तुमच्या कारची किंमत वाढेल. शून्य डाऊन पेमेंट आणि तुम्हाला शक्य असलेली ठराविक रक्कम या दोन्ही पर्यायांची तुलना करून एकूण किती व्याज जास्तीचे द्यावे लागेल, ते बघून याविषयीचा निर्णय घेता येईल.