रिकरिंग डिपाॅझिट (RD) म्हटल्यावर जास्त करुन अल्प मुदतीसाठी गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ओळखल्या जाते. मात्र, तुम्ही पोस्टात आरडी उघडायचा विचार करत असल्यास सलग पाच वर्ष तुम्हाला आरडीत ठरवलेली रक्कम जमा करत राहावी लागते. त्यानंतर अवधीची मुदत संपल्यावर तुम्हाला व्याजासहित पैसे मिळतात.
हेच तुम्ही बॅंकेत जर आरडी करत असाल तर तुम्हाला तुमच्या आरडीचा अवधी तुमच्या गरजेनुसार ठरवता येते. म्हणजे तुम्ही सहा महिने मुदतीच्या अवधीपासून आरडी उघडू शकता. सध्या पोस्टाच्या आरडीत 6.5 टक्के व्याजदर मिळत आहे. त्यामुळे तुमची पोस्टात आरडी असेल तर तुम्ही चांगला व्याजदर मिळवू शकता. तसेच, तुम्हाला पैशांची गरज असल्यास तुम्ही तुमच्या आरडीवर लोनही मिळवू शकणार आहात.
लोन मिळवण्याचा नियम
तुम्ही आरडीत 1 वर्ष कोणताही हप्ता न चुकवता पैसे भरत राहिल्यास तुम्हाला सहज लोन मिळू शकते. म्हणजेच तुम्हाला सलग 12 हप्ते भरणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या खात्यात जमा असलेल्या रकमेवर 50 टक्के लोन काढू शकता.
तसेच, ते फेडण्याचा विचार केल्यास तुम्ही लोनची रक्कम एकठोक किंवा महिन्यावारी हप्त्यानुसार फेडू शकता. तसेच, लोन घेतले म्हटल्यावर व्याज द्यावेच लागणार आहे. त्यामुळे लोनच्या रकमेवर व्याज 2 टक्के + आरडी खात्यावरील लागू आरडी व्याजदराच्या रुपात लागू होणार आहे.
तसेच, व्याजाचा हिशोब लोन घेतले त्या दिवसापासून त्याची परतफेड केली त्या दिवसापर्यंतचा धरण्यात येणार आहे. याशिवाय तुम्ही वेळेत लोन फेडले नाही तर तुमची आरडी मॅच्युअर झाल्यावर लोनचे पैसे व्याजासहित कट केले जाणार आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असेल आणि तुम्ही लोन घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला पासबुकसह लोनचा फॉर्म भरुन पोस्टात जमा करावा लागणार आहे.
पोस्टात आरडी उघडण्याचे फायदे
आरडी म्हटल्यावर तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक ठरावीक रक्कम प्रत्येक महिन्याला डिपाॅझिट करु शकता. त्यामुळे प्रत्येकजण आरडीचा लाभ घेताना दिसतो. मात्र, पोस्टात तुम्ही कमीतकमी 100 रुपयांपासून आरडी सुरू करु शकणार आहात. तसेच, यात तुम्हाला पाच वर्षासाठी पैसे भरत राहावे लागणार आहेत. यामध्ये कंपाउंड व्याजाचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे.
त्यामुळे तुम्हाला पाच वर्षांत चांगला रिटर्न मिळतो. तुमच्या आरडी खात्याची मॅच्युरिटी पाच वर्षाची असली तरी तुम्ही तीन वर्षानंतर प्री-मॅच्युअर क्लोजर करु शकता. याशिवाय यात नॉमिशेनची सुविधा आहे. त्यामुळे तुम्ही पोस्टात आरडी उघडली नसल्यास, ती उघडणे तुमच्या फायद्याचे ठरु शकते. तसेच, तुमची आरडी असल्यास, तुम्ही या फायद्यांचा सहज लाभ घेऊ शकणार आहात.