• 02 Oct, 2022 09:03

'एलआयसी'ची नवीन पेन्शन प्लस प्लॅन; नियमित खात्रीशीर उत्पन्न देणारी योजना

LIC

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) नवीन पेन्शन प्लस प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅननुसार पॉलिसीधारकाला नियोजनबद्ध पद्धतीने पैशांची बचत करता येईल जी भविष्यात नियमित उत्पन्न मिळवून देईल, असा दावा एलआयसीने केला आहे.

LIC New Pension Plus Plan: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) नवीन पेन्शन प्लस प्लॅन बाजारात आणला आहे. ही एक नॉन पार्टिसिपेटिंग, युनिट लिंक योजना आहे. या योजनेत पॉलिसीधारकाला नियमितपणे गुंतवणूक करुन बचत करता येईल. या योजनेची मुदतपूर्ती झाल्यानंतर पुढे नियमित उत्पन्न मिळेल.

ही योजना एकाच वेळी प्रिमियम भरुन खरेदी करता येऊ शकते किंवा नियमित प्रिमियम भरण्याचा पर्याय या योजनेत उपलब्ध आहे. नियमित प्रिमियम पर्याय हा पॉलिसीच्या मुदतीनुसार ठरवला जातो. पॉलिसीधारकाला प्रिमियमची रक्कम निवडण्याचा अधिकार आहे. किमान आणि कमाल प्रिमियम रक्कम, पॉलिसीची मुदत आणि कोणत्या वयापासून पेन्शन सुरु करायचे आहे (Vesting Age) याबाबतचा निर्णय पॉलिसीधारक घेऊ शकतो. या पॉलिसीचा संचय कालावधी किंवा स्थगिती कालावधी वाढवण्याबाबतचा पर्याय देखील काही अटी आणि शर्थींनुसार पॉलिसीधारकाला उपलब्ध आहे.

पॉलिसीधारकाला चार प्रकारातील फंड्समध्ये प्रिमियम गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. प्रत्येक प्रिमियमवर अॅलोकेशन चार्जेस आकारले जातील. उर्वरित रकमेतून पॉलिसीधारकाने निवडलेल्या फंडामधील युनिट्सची खरेदी केली आहे. एका वर्षात फंड बदलण्यासाठी चार वेळा संधी दिली जाईल, अशी सुविधा या योजनेत आहे.

सक्रिय असलेल्या योजनेत पॉलिसीधारकाला एका वार्षिक प्रिमियमच्या काही टक्के प्रिमियम गॅरंटेड अॅडिशन म्हणून द्यावा लागेल. नियमित प्रिमियमवरील गॅरंटेड अॅडिशन हा 5.0 ते 15.5% या दरम्यान असेल. पॉलिसीला काही ठराविक वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकल प्रिमियमवर तो 5% इतका असेल. गॅरंटेड अॅडिशनमधील रक्कम फंडातील युनिट्स खरेदी करण्यासाठी वापरली जाईल. या योजनेतील एनएव्हीची दररोज गणना केली जाईल.