शेअर मार्केटमध्ये कंपन्या मोठ्या दिमाखात आणि गाजावाजा करत IPO घेऊन येतात. गुंतवणूकदारही या मार्केटिंगला भुलून IPO च्या मागे धावतात. मात्र, नंतर निराशा पदरी येते. प्रत्येक IPO तील गुंतवणूक नफा मिळवून देतो असे नाही. मागील वर्षी बाजारात IPO आणलेल्या 8 कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान केले आहे.
यातील काही शेअर्स त्यांच्या इश्यू प्राइजपेक्षा तब्बल 70 टक्क्यांनी खाली आले आहेत. विमा क्षेत्रातील बलाढ्य सरकारी कंपनी LIC, माल वाहतूक, पार्सल सुविधा क्षेत्रातील डेलिव्हरी कंपनीसह कोणत्या 8 कंपन्यांनी गुंतवणूकदारांची निराशा केली ते पाहूया.
LIC च्या शेअरची पडझड
LIC चा IPO मागील वर्षी मे मध्ये आला होता. सर्वात मोठी सरकारी कंपनी असल्याने पारंपरिक गुंतवणूकदार या शेअरकडे आकर्षित झाले होते. शेअरची इश्यू किंमत 949 रुपये होती. अनेक पटींनी हा शेअर सबस्क्राइब झाला. मात्र, आज घडीला हा शेअर इश्यू प्राइजपेक्षा 30 टक्क्यांनी खाली आला आहे. IPO बाजारात लिस्ट झाल्यानंतर लगेच 867 रुपयांवर आला होता. मात्र, वर जाण्याऐवजी शेअर खालीच येत राहीला. सध्या 627 रुपयांवर शेअर ट्रेड करत आहे. LIC कधी नफ्यात येईल याची वाट गुंतवणूकदार पाहत आहेत.
डेलिव्हरीचा शेअरही खालीच
वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील कंपनी डेलिव्हरीचा शेअर सध्या 402 रुपयांवर ट्रेड करत आहे. इश्यू प्राइजपेक्षा 17 टक्क्यांनी खाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात IPO दरम्यान शेअरची किंमत 487 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र, अद्यापही गुंतवणूकदार तोट्यात आहेत. डेलिव्हरीचा शेअर भविष्यात वरती जाईल, असा अंदाज शेअर मार्केट विश्लेषकांचे मत आहे.
AGS Transact Technologies या कंपनीचा IPO जानेवारी 2022 मध्ये आला होता. हा शेअर तब्बल 68 टक्क्यांनी खाली आला आहे. सध्या 56 रुपयांवर शेअर ट्रेड करत असून याची इश्यू किंमत 175 रुपये आहे.
उमा एक्सपोर्ट या कंपनीचा शेअर 16% तर Udayshivakumar Infra चा शेअर 15 टक्क्यांनी खाली आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात या दोन्ही कंपन्यांचे IPO आले होते.
Elin Electronics या कंपनीचा शेअर इश्यू किंमतच्या 41 टक्के खाली येऊन 146 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअरची इश्यू किंमत 146 रुपये होती. धर्मराज कॉर्प गार्ड या कंपनीचा शेअरही 28 टक्क्यांनी खाली येऊन 171 रुपयांवर ट्रेड करत आहे. याची इश्यू प्राइज 237 रुपये होती. 2022 च्या डिसेंबर महिन्यात या दोन्ही कंपन्यांचे IPO आले होते. तेव्हापासून शेअर तोट्यात आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचेही मोठे नुकसान झाले आहे.